ChatGPT 1980s Retro Look AI Trend: सध्या सर्वत्र ChatGPT चा १९८० च्या रेट्रो-लूकचा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. लहान-मोठ्यांपासून विविध क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या लोकांना देखील या ट्रेंडने भुरळ घातली आहे. अनेक कलाकार, राजकारणी देखील या लूकमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. या ट्रेंडमध्ये फोटोत विंटेज हेअरस्टाईल आणि पोशाख यासह फिल्मसारख्या टेक्स्चरच वापर केला जात आहे. ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर आता वैयक्तिक फोटो, विशेषतः चेहरा, एआय चॅटबॉटवर अपलोड करणे किती सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हायरल एआय ट्रेंडबाबत चिंता

एआय-निर्मित फोटोंबाबत उपस्थित केली जाणारी चिंता नवीन नाही. यापूर्वी देखील व्हायरल ट्रेंड्स व्हायरल झाल्यानंतर याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. चॅटजीपीटी घिबली ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर देखील सायबर विभागाने नेटकऱ्यांना सावध केले होते. एआय ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर सायबर तज्ज्ञांनी नेटकऱ्यांना त्यांनी अपलोड केलेल्या माहितीचा कशापद्धतीने वापर केला जाऊ शकतो याबाबत सतर्क केले होते.

तज्ज्ञांचा इशारा

“एखादा ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर लोक लगेच त्यात सहभाग घेण्यासाठी घाई करतात. पण, या माहितीचा कसा गैरवापर केला जाऊ शकतो याचा क्षणभरही त्यांच्या डोक्यात विचार येत नाही”, असे जागतिक दर्जाचे सायबर तज्ज्ञ जेक मूर यांनी फोर्ब्जशी बोलताना म्हटले होते. तसेच, “चॅटजीपीटी सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा तुमचे फोटो आणि वैयक्तिक माहिती अपलोड करता तेव्हा, ती माहिती गोळा करुन त्याचं विश्लेषण केले जाते. ही माहिती साठवून त्याचा वापर अधिक प्रगत मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी केला जातो”, असे मूर यांनी म्हटले आहे.

वैयक्तिक माहितीबाबत चिंता

एआयचा वापर करणारा व्यक्ती अचूक फोटोची मागणी करतो त्यावेळी ही समस्या अधिक पटीने वाढते असेही या विषयातील तज्ज्ञ सांगतात. “सध्या व्हायरल होणाऱ्या ट्रेंडमध्ये रिझल्ट चांगले मिळावे यासाठी नेटकरी मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक माहिती एआय चॅटबॉटला पुरवत आहेत. रिझल्ट मनाप्रमाणे आला नाही तर अधिक माहिती पुरवली जाते, यामुळे एआयला अधिक वैयक्तिक माहिती प्राप्त होते”, असे सिटीडेलचे संस्थापक संचालक मॅट कॉनलोन यांनी फोर्ब्जशी बोलताना सांगितले.

ओळख चोरी होण्याचा धोका

“स्वत:ची माहिती देऊन फोटो किंवा चित्र तयार करुन घेण्यात आनंद वाटतो पण, यामुळे डेटा सुरक्षा आणि भविष्यात तुमची ओळख चोरी करण्याचा धोका अधिक निर्माण होतो. एकदा का ही माहिती अपलोड केली की ती माहिती भविष्यात हटवली जाईल, याची खात्री नाही”, असेही कॉनलोन म्हणाले. दरम्यान, कोणताही ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर नेटकरी लगेच माहिती अपलोड करण्याची घाई करण्याचा प्रकार वाढल्याचे दिसून येते.