चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे एका प्रवाशाच्या अजब कृत्याने एकच खळबळ उडाली. शारजाहून चेन्नईला आलेल्या ‘एअर अरेबिया’च्या विमानातून एका ३४ वर्षीय प्रवाशाने चक्क चालत्या विमानातून खाली उडी मारली. विमान धावपट्टीवरून टॅक्सीवेकडे (Taxiway) जात असताना या प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा (Emergency Exit) उघडला आणि बाहेर उडी मारली. या प्रकारामुळे विमानातील २३१ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एअर अरेबियाचे हे विमान शारजाहून चेन्नईला आले होते. पहाटे ३:२० च्या सुमारास विमानाने धावपट्टीवर लँडिंग केले. विमान मुख्य रनवे सोडून पार्किंगच्या दिशेने संथ गतीने जात होते. विमान पूर्णपणे थांबण्यापूर्वीच, संबंधित प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली. सुदैवाने, विमान संथ गतीने असल्याने प्रवाशाला कोणतीही गंभीर इजा झाली नाही आणि विमानाचेही नुकसान झाले नाही. विमानातील २३१ प्रवाशी होते, याबाबत इंडिया टुडे वृत्त प्रसिध्द केले आहे.
प्रवाशाची प्रकृती बिघडली होती?
विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रवासी प्रवासादरम्यान आजारी होता. “विमानात असताना त्याला मळमळत होते आणि त्याने दोनदा उलट्याही केल्या होत्या,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कदाचित अस्वस्थ वाटत असल्याने किंवा घाबरल्यामुळे त्याने घाईघाईने विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सुरक्षा यंत्रणांची धावपळ
या घटनेनंतर वैमानिकाने तातडीने ग्राऊंड कंट्रोलला याची सूचना दिली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या प्रवाशाची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसली, तरी तो तामिळनाडूचा रहिवासी असल्याचे समजते.
विमानतळ कामकाजावर परिणाम
या सुरक्षा त्रुटीमुळे विमानतळ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य धावपट्टी पहाटे ०३:२३ ते ०४:२३ या वेळेत बंद ठेवली होती. या काळात इतर विमानांचे लँडिंग दुसऱ्या धावपट्टीवर वळवण्यात आले होते. सुमारे एका तासानंतर विमानतळाचे कामकाज पूर्ववत झाले.
वैमानिक आणि क्रू मेंबर्सनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे आणि इतर प्रवाशांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, धावत्या विमानातून अशा प्रकारे उडी मारणे ही एक मोठी सुरक्षा चूक मानली जात असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रवाशाची मानसिक स्थिती आणि त्याच्या कृतीमागचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
