London Trip to 1000 Employees: दिवाळीला कंपनीकडून सोनपापडीचा पुडाही ज्यांना मिळत नाही, त्यांना काजूकतली देणारी कंपनीही खूप मोठी वाटते. दर दिवाळीला बॅगा भरून गिफ्ट देणाऱ्या, गाड्या, बोनस देणाऱ्या कंपन्यांचे रिल्स व्हायरल होत असतात. पण भारतात सध्या चेन्नईमधील एका रिअल इस्टेट कंपनीची जोरदार चर्चा आहे. या कंपनीने त्यांच्या १,००० कर्मचाऱ्यांसाठी तब्बल सात दिवसांची लंडनची सहल प्रायोजित केली आहे. चेन्नई आणि दुबईतील उत्कृष्ट काम करणाऱ्या हजार कर्मचाऱ्यांना लंडनवारी करण्याची संधी देण्यात आली आहे.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईमधील रिअल इस्टेट कंपनीने त्यांच्या वार्षिक नफ्यातील भाग म्हणून १,००० कर्मचाऱ्यांसाठी एक आठवडाभराच्या लंडन सहलीचे आयोजन केले आहे. भारत आणि दुबईमधील कार्यालयातील त्यांच्या ७,००० कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १५ टक्के म्हणजेच १,००० कर्मचाऱ्यांना ही संधी देण्यात आली आहे.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी अनेक वर्षांपासून कंपनी हा उपक्रम राबवत आहे. आतापर्यंत ६,००० कर्मचाऱ्यांना सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई आणि स्पेन यासारंख्या देशात सहली घडवून आणल्या आहेत. कंपनीच्या मते, या उपक्रमातून कर्मचाऱ्यांना केवळ विश्रांतीच नाही तर खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव मिळतो, नव्या गोष्टी शिकता येतात.

सर्वांना एकसमान विमान आणि हॉटेल रुम्स

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, हजार कर्मचाऱ्यांना ही सहल घडवून आणण्यासाठी एक टीम समर्पित करण्यात आली आहे. एअरलाइन्सशी बोलणे, राहण्याची व्यवस्था करणे आणि फिरण्याचे नियोजन करणे ही सर्व व्यवस्था या टीमकडे असेल. तसेच सर्वच कर्मचाऱ्यांना विमान, हॉटेल या एकसारख्याच सुविधा देण्याचा अतिशय स्तुत्य असा निर्णय कंपनीने घेतलेला आहे. यातून प्रत्येक कर्मचारी एकसमान आहे, ही भावना रुजवली गेली आहे.

सात दिवसांच्या या सहलीत सर्व कर्मचारी सेंट पॉल कॅथेड्रल, लंडन ब्रिज, बिग बेन, बकिंगहॅम पॅलेस, पिकाडिली सर्कस, ट्रॅफलगर स्क्वेअर, मदाम तुसाद म्युझियम आणि थेम्स नदीवरील क्रूझ या प्रतिष्ठित स्थळांना भेट देतील.

कंपनीचे नाव काय? मालक कोण?

कर्मचाऱ्यांसाठी नफ्यातील मोठा हिस्सा खर्च करणाऱ्या या कंपनीचे नाव आहे कॅसाग्रँड. रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारी ही चेन्नईतील एक प्रितिष्ठित कंपनी आहे. कंनपीचे संस्थापक आणि एमडी अरुण एमएन या उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले, आमची कंपनी संपत्तीचा वाटा कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्यावर विश्वास ठेवते. कंपनीच्या स्थापनेपासूनच आम्ही कर्मचाऱ्यांना वार्षिक बक्षीस देत आहोत. ही परंपरा कायम ठेवली आहे.