चेन्नईसाठी पुढील ४८ तास चिंताजनक; हवामान खात्याचा इशारा

बुधवारीही चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

Natural Disasters in Chennai, पावसाने चेन्नईमध्ये हाहाकार,chennai rain, चेन्नईत पाऊस
मंगळवारी साधारणपणे १४ तासांत २० सेंटिमीटर पाण्याची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साठले आहे.

चेन्नईत सोमवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचले असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पाऊस असाच सुरू राहणार असून चेन्नईसाठी पुढील ४८ तास चिंताजनक असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसाने चेन्नईतील गेल्या १०० वर्षातील पर्जन्यवृष्टीचे विक्रम मोडीत काढले आहेत. एकाच दिवसात महिन्याच्या सरासरीइतका पाऊस पडल्याने चेन्नईत ठिकठिकाणी पाणी साठले आहे. दरम्यान, चेन्नईसह उपनगराच्या परिसरात पुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर आणि नौदलाची पथके रवाना करण्यात आली आहेत.

मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास संपूर्ण चेन्नई शहरात सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडू सरकारने शाळा, महाविद्यालयांना तातडीची सुटी जाहीर केली असून, अनेक कारखाने आणि खासगी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली आहे. पावसामुळे विमानतळावरही गुडघ्यापर्यंत पाणी साठल्यामुळे विमान उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. बुधवारीही चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे विविध ठिकाणी अडकलेल्यांच्या सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान, लष्कराचे जवान यांची मदत घेण्यात येते आहे.

फोटो गॅलरी : …आणि चेन्नई पाण्यात बुडाली

मंगळवारी साधारणपणे १४ तासांत २० सेंटिमीटर पाण्याची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साठले आहे. त्यामुळे शहराच्या ६० टक्के भागांतील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे शहरातील काही रुग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार करता येऊ शकले नाही. विमानतळावरही पाणी साठल्यामुळे मंगळवारी दुपारनंतर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. बुधवारी सकाळपर्यंत पाणी न ओसल्याने अजूनही विमानतळ बंदच आहे. बुधवारी दुपारनंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
चेन्नई शहराच्या दक्षिण भागांतून मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले अनेक चाकरमाने अद्यापही घरी परतलेले नाहीत. हे सर्वजण कार्यालयामध्ये किंवा अन्यत्र ठिकाणी अडकून पडलेले आहे. तांबरम आणि मुदिचूर भागामध्येही अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येते आहेत.
शहराच्या दक्षिण भागाकडे जाणारे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असल्यामुळे त्या बाजूच्या भागाचा आणि गावांचा शहराशी संपर्कच तुटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानकांवरही हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chennai drowns in deluge of water flight services suspended

ताज्या बातम्या