तामिळनाडूच्या विविध भागात बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. बंगालच्या उपसागरावर दबाव निर्माण झाल्यामुळे पुढील किमान दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. चेन्नई आणि जवळील चेंगेलपेट, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि विल्लुपुरम येथे बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. पाऊस विशिष्ट प्रदेशात विखुरलेला तसंच मुसळधार, खूप मुसळधार आणि अत्यंत मुसळधार आणि इतर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम असेल अशी अपेक्षा आहे.

हवामान विभागाने म्हटले आहे की, “नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील दबाव चेन्नईच्या १४० किमी आग्नेय पूर्वेस आहे, आज संध्याकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू -दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान चेन्नईच्या आसपास असेल. जोरदार वारे वाहतील. त्यामुळे ६ जिल्ह्यांमध्ये अत्यंत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सततच्या पावसामुळे चेन्नई शहरातील अनेक भागात पाणी साचण्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. वाहतूक वळवणे आणि प्रमुख भुयारी मार्ग बंद केल्याने तेथील जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. २०१५ सारखी परिस्थिती आता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. २०१५ मध्ये, चेन्नईला भयानक पूर आला होता आणि त्यानंतर मुसळधार पाऊस पडला होता आणि चेंबरमबक्कम जलाशयातून अतिरिक्त पाणी अडयार नदीत सोडले होते.

चेन्नईत मुसळधार पावसाने पाणी साचल्याने दुराईसामी सबवे बंद करण्यात आला आहे. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मच्छिमारांना अशा परिस्थितीत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.