Chetan Bhagat on Ketan Agarwal murder: महाराष्ट्रच नव्हे तर देशाला केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने हादरवून सोडले आहे. लोहगडावर घडलेल्या या घटनेत सिया गोयल आणि तिचा प्रियकरावर संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून, देशभरातून अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. याप्रकरणावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील भाष्य केले आहे. सियाने लग्नाला नकार का कळवला नाही? तसेच देशातील व्यावसायिक कुटुंबांच्या प्रतिगामी विचारसरणीवर चेतन भगत यांनी बोट ठेवले.
सॉरी म्हणून हा विषय सोडवता आला असता – भगत
लेखक चेतन भगत यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मत मांडले. “सिया गोयल दोषी असेल तर, कायद्याने तिला शिक्षा होईल. फक्त कायद्यालाच तिला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. मला किंवा दुसऱ्या कोणाला नाही. माझे लिखाण किंवा मीडिया ट्रायलने काय होणार नाही. मी तिच्या कथित गुन्ह्याचे समर्थन करत नाही पण यावर चर्चा होऊ शकते”, असे मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी नोंदवले. भगत यांनी यावेळी देशातील व्यावसायिक आणि त्यांच्या समस्यांवर देखील बोट ठेवले. सियाकडे सोपा मार्ग होता की ती तिच्या बॉयफ्रेन्डबरोबर कोर्टात जाऊन लग्न करु शकली असती आणि दोन्ही कुटुंबांना लग्नाच्या प्रमाणपत्राचा पीडीएफ पाठवू शकली असती आणि सॉरी म्हणून हा विषय सोडवता आला असता, असे मत भगत यांनी मांडले.
प्रतिगामी विचारसरणीवर भाष्य
सियाने पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तिला लग्न रद्द केल्यास कुटुंबासाठी शर्मेची बाब ठरेल असे सांगितले. “देशातील व्यावसायिकांची कुटुंब प्रतिगामी असतात, आणि त्यांना मुलांना शिस्तीत ठेवण्यासाठी आणि श्रीमंती दाखवण्याची लग्न हा एक सोहळा असतो. हे फार पूर्वीपासून चालत आलं आहे. व्यावसायिकांची मुलं देखील याला विरोध करत नाहीत कारण आर्थिक गरजांसाठी ते पालकांवर अवलंबून असतात, उत्तम शिक्षण घेत नाहीत, आरामदायी आयुष्य जगतात”, असे चेतन भगत म्हणाले. पालकांनी सिया दोषी आढळल्यास तिला कठोर शिक्षा देण्याची किंवा लोहगडावर ढकलण्याच्या मागणीवर देखील भगत यांनी भाष्य केले.
अनेक कुटुंबांमध्ये समस्या असल्याचा दावा
“सिया दोषी असल्यास तिला कायद्याने शिक्षा होईल, न्यायालय ते ठरवेल. सियाला घरी तिचे मत कळवता येईल असे वातावरण घरात का निर्माण केले नाही. १९ वर्षांची असताना तिचे लग्न ठरवण्यात आले. सियाचे कल्बमधील व्हिडीओ समोर आलेत आणि तिचे आई-वडील नाकारत आहेत, हा कसला बचाव?”, असे चेतन भगत ‘इंडिया टुडे’शी बोलताना म्हणाले. भगत यांनी प्रतिगामी कुटुंबांचा पुनरुच्चार करताना देशात आजही अनेक करिअर निवडण्याचा, पती निवडण्याचे स्वातंत्र्य नसल्याचे सांगितले. देशातील ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
