केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचं निषेध आंदोलन सुरु आहे. अनेक बॉलिवूड आणि पंजाबी कलाकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. यावर आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील ट्विटद्वारे भाष्य केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सोशल माडियात सध्या खूपच चर्चा सुरु आहे.

चेतन भगत म्हणतात, “कोणताही कायदा परिपूर्ण नसतो. जर कृषी कायद्यांविरोधात भीती आहे तर त्यावर बसून, चर्चा करुन, बदल करुनच तोडगा निघू शकतो. परंतू कायदा रद्द करण्याची मागणी म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक पाऊल मागे गेल्यासारखं होईल. यामध्ये छोट्या उद्योगांतून बाहेर येत भांडवलशाहीची आणि मोठ्या सुधारणेची गरज आहे.” भगत यांचं हे ट्विट सोशल मीडियातून व्हायरल झालं असून युजर्सनी त्यावर अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

दरम्यान, कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना एक लिखित प्रस्ताव दिला. यामध्ये नव्या कृषी कायद्यांमध्ये किमान आधारभूत किंमत कायम राहिल, असं आश्वासन देण्यात आलं. तर सरकारने हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीनं करण्यात आली.
यापूर्वी मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शेतकरी नेत्यांसोबत एक बैठक बोलावली होती. मात्र, ती देखील निष्फळ ठरली. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, सरकारच्या लिखित प्रस्तावावर विचारविनियम केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.