छत्रपती संभाजीनगर: वडिलांनी न्यायालयातून घराची केस जिंकली, पण हाच विजय त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलाने ८२ वर्षीय वृद्ध वडिलांची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. न्यायालयाने घराचा ताबा वडिलांकडे सोपवण्याचा निकाल दिल्याने संतापलेल्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले. जाफर कमरउद्दीन सय्यद पटेल (वय ८२ वर्ष) असे मृत वडिलांचे नाव असून, पोलिसांनी आरोपी मुलगा अब्दुल रहमान अब्दुल जाफर याला अटक केली आहे.
छळाला कंटाळून वडिलांनी घेतला होता न्यायालयाचा आश्रय
मृत जाफर पटेल हे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांचा मुलगा अब्दुल रहमान हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल हा घरात सातत्याने वाद घालायचा आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण करायचा. मुलाच्या या जाचाला आणि गैरवर्तनाला कंटाळून अखेर जाफर पटेल हे पुण्यात राहणाऱ्या आपल्या मुलीकडे निघून गेले होते.
मुलाने घर रिकामे करावे आणि छळ थांबवावा, यासाठी जाफर पटेल यांनी कोर्टात कायदेशीर लढाई सुरू केली होती. गेल्या दोन वर्षांपासून हा न्यायालयीन संघर्ष सुरू होता.
न्यायालयाचा निकाल आला अन् घात झाला…
या प्रकरणाचा निकाल लागून कोर्टाने वडिलांच्या बाजूने निकाल दिला. मुलाने घर रिकामे करून ते वडिलांच्या स्वाधीन करावे, असा आदेश न्यायालयाने दिला. दोन वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या विजयाचा आदेश (Eviction Order) घेऊन जाफर पटेल हे आपल्या मुलीसोबत रिक्षाने घरी परतत होते.
मात्र, कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात गेल्याने मुलगा अब्दुल रहमान प्रचंड संतापला होता. त्याने वडिलांचा पाठलाग केला आणि भररस्त्यात त्यांची रिक्षा अडवली. काही समजण्याच्या आतच त्याने सर्वांसमक्ष वडिलांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
बहिणीवरही जीवघेणा हल्ला
वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या बहिणीवरही नराधम भावाने हल्ला केला. या हल्ल्यात जाफर पटेल यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाफर पटेल यांचा मात्र जागीच मृत्यू झाला.
आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळजनक उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी मुलगा अब्दुल रहमान याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र, मालमत्तेच्या वादातून एका सुशिक्षित मुलाने पोटच्या वडिलांचा जीव घेतल्याने समाजातील कौटुंबिक मूल्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
