chhattisgarh chief minister s deputy secretary arrested by enforcement directorate zws 70 | Loksatta

छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिवास ‘ईडी’कडून अटक; कोळसा घोटाळाप्रकरणी कारवाई

प्राप्तिकर विभागाच्या तक्रारीची दखल घेऊन ‘ईडी’कडून या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू आहे

छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिवास ‘ईडी’कडून अटक; कोळसा घोटाळाप्रकरणी कारवाई
(संग्रहित छायाचित्र) photo source : indian express

रायपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यालयातील उप सचिव सौम्या चौरसिया यांना अटक केली. छत्तीसगडमधील कथित अवैध कोळसा शुल्कआकारणी घोटाळय़ातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

छत्तीसगडमधील प्रभावशाली सनदी अधिकारी असलेल्या चौरसियांना ‘ईडी’ने चौकशी केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलमांनुसार अटक केली. अटकेनंतर चौरसिया यांना आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकाकडून न्यायालयात नेत असताना स्थानिक प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. या प्रकरणी अनेक छापे टाकल्यानंतर ‘ईडी’ने ऑक्टोबरमध्ये राज्यातील सनदी अधिकारी समीर बिश्नोई व अन्य दोघांना अटक केली होती.

मुख्यमंत्री बघेल यांनी गेल्या आठवडय़ात पत्रकारांशी बोलताना ‘ईडी’वर टीकेची झोड उठवताना ‘ईडी’ने आपल्या मर्यादांचे उल्लंघन करून, छत्तीसगडमधील नागरिकांना अमानुष वागणूक देत असल्याचा आरोप केला होता.

आरोप काय? प्राप्तिकर विभागाच्या तक्रारीची दखल घेऊन ‘ईडी’कडून या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. छत्तीसगडमध्ये वाहतूक केल्या जाणाऱ्या कोळशावर २५ रुपये प्रति टन अवैध शुल्क आकारणी केली जात होती. या मोठय़ा आर्थिक गैरव्यवहारात वरिष्ठ नोकरशहा, व्यापारी, राजकारणी आणि मध्यस्थांच्या कंपूचा हात असल्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 03:36 IST
Next Story
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा