scorecardresearch

Premium

काँग्रेस नेते धार्मिक मुद्यांवर का बोलत नाहीत? मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले…

Express Adda With Chhattisgarh CM Bhupesh Baghel : छत्रीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, आम्ही (काँग्रेस) केवळ मतांसाठी हिंदू नसतो, त्यांच्यासारखं (भाजपा) फोडा आणि राज्य करा, असलं राजकारण करत नाही.

Bhupesh Baghel
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (PC : Indian Express)

आम्ही केवळ मतांसाठी हिंदू नसतो, आम्ही संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेला बरोबर घेऊन पुढे जात आहोत. वेगवेगळ्या भाषा, जाती आणि धर्म असलेला हा आपला देश आम्ही (काँग्रेस) एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं वक्तव्य छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे. तसेच भाजपाचं राजकारण हे फोडा आणि राज्य करा या प्रकारचं आहे असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला. भूपेश बघेल हे आज (२४ ऑगस्ट) इंडियन एक्सप्रेसच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडसह देशभरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपाचं राजकारण ते आगामी लोकसभा निवडणुकीविषयीच्या सर्व प्रश्नांवर उत्तरं दिली.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना यावेळी विचारण्यात आलं की, तुम्ही धर्माच्या विषयावर बोलताना दिसता, परंतु, बहुतांश काँग्रेसचे नेते, वेगवेगळ्या राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि मंत्री धार्मिक मुद्दे, लोकांच्या आस्था याबद्दल बोलताना संकोचतात, असं नेमकं का होतंय? त्यावर मुख्यमंत्री बघेल म्हणाले, काँग्रेस नेत्यांची ही प्रतिमा तुम्ही प्रसारमाध्यमांनीच बनवली आहे. तुम्ही म्हणताय तसं जर असतं तर हिमाचल प्रदेशमध्ये आमची सत्ता आलीच नसती. हे राज्य लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक हिंदू असलेलं राज्य आहेत, तुम्ही म्हणताय तसं काही असतं तर तिथे कधीच काँग्रेसची सत्ता आली नसती. आम्ही तिथे फिरलो, तिथल्या मंदिरांमध्ये गेलो. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी तिथल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं.

DharmaraoBaba Atram nagpur
“राजकारणात काहीही होऊ शकते,” धर्मरावबाबा आत्राम असे का म्हणाले?
jayant patil vs samrat mahadik
शिराळ्याचे राजकारण कोणत्या दिशेने?
What Arvind Kejriwal Said?
“चौथी पास राजाला माझं खुलं आव्हान…”, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींविरोधात आक्रमक
B K Hariprasad
कर्नाटक : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर, बड्या नेत्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका!

मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, आम्ही केवळ मतांसाठी हिंदू नाही, आम्ही देशातल्या सगळ्या जनतेला बरोबर घेऊन पुढे जात आहोत. अनेक लोक रोजा (मुस्लीम समुदायाची रमजान महिन्यातील उपवासाची प्रथा) ठेवायला, इफ्तार पार्टी करायला घाबरतात. परंतु, आम्ही आमच्या छत्तीसगडमध्ये ते करतो. छत्तीसगडमध्ये आदिवासी लोकांसाठी आम्ही मंदिरं उभारली आहेत. दरवर्षी आमच्या राज्यात आदिवासी नृत्य महोत्सवाचं आम्ही आयोजन करतो. जगभरातील कित्येक देशांमधील लोक तिथे येतात.

भूपेश बघेल म्हणाले, आम्ही सगळ्यांना एकत्र करून पुढे चाललो आहोत. आमचं त्यांच्यासारखं (भाजपा) एकतरफी प्रकरण नाही. त्यांना केवळ फोडा आणि राज्य करा, असंच वागायचं आहे. पंरतु, काँग्रेसचे विचार तसे नाहीत. राहुल गांधी काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना? ते म्हणतात तिरस्कार सोडा भारत जोडा (नफरत छोडो, भारत जोडो), तुम्ही (भाजपा) काय केलं? तुमही केवळ हिंसा आणि घृणा पसरवण्याचं काम करत आहात. लोकांमध्ये फूट पाडा आणि त्यांची मतं मिळवा एवढंच सुरू आहे.

हे ही वाचा >> “दरवाजा उघडलाय, आता…”, कॅनेडियन अंतराळवीराचं Chandrayaan 3 बद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, “भारतीय लोक…”

भूपेश बघेल म्हणाले, हे लोक (भाजपा) केवळ लोकांमध्ये फूट पाडत आहेत. फोडा आणि राज्य करा असंच सुरू आहे. त्यामुळे तो ट्रेनमधील रेल्वेचा जवान, त्याच्या वरिष्ठाला गोळ्या घालून डब्ब्यांमध्ये फिरला आणि त्याने शोधून, निवडून काही लोकांना गोळ्या घातल्या. हे का झालं? तर तुम्ही (भाजपा) सातत्याने लोकांच्या डोक्यात आणि मनात विष कालवताय.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chhattisgarh cm bhupesh baghel says we are not hindus for votes like bjp asc

First published on: 24-08-2023 at 22:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×