Chhattisgarh Gariaband district communual riots: छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात जातीय दंगलीची घटना घडली आहे. ही घटना दुतकैया या कमी लोकसंख्येच्या गावात घडली. रविवारी (०१ फेब्रवारी) एका जमावाने अल्पसंख्याक समुदायातील ६ लोकांची घरे जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. दरम्यान, पोलिसांच्या एका छोट्या पथकाने अनेक लहान मुलांसह २० जणांना वाचवले. यावेळी सात पोलीस कर्मचारी जखमी झाले.
रविवारी पहाटे झालेल्या काही घटनांमुळे दंगल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दंगल होण्यापूर्वी काही तास अगोदर चार वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांवर हल्ला करण्यात आला आणि दोघांचे मोबाईल फोन लुटण्यात आले होते. या घटनांमधील तीन आरोपींची ओळख पटली आहे. त्यामध्ये आरिफ कुरेशी (१८) आणि सलीम खान (२३) हे दुतकैया येथील आहेत आणि इम्रान सिद्दीकी (१८) हे रायपूर येथील आहे. नंतर त्याच दिवशी दुपारी ४ ते रात्री ११.३० च्या दरम्यान, डझनभर ग्रामस्थांनी अल्पसंख्याक समुदायाच्या सहा घरांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
१०० पैकी १० कुटुंबे अल्पसंख्याक समुदायाची
दंगल झालेल्या दुतकैया गावात जवळपास १०० कुटुंबे राहतात. त्यामध्ये सुमारे १० अल्पसंख्याक समुदायाची कुटुंबे आहेत. पोलिसांनी सांगितले की, २०२४ मध्येही एका धार्मिक चिन्हाची विटंबना करण्यात आल्याने तिथे जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी तणाव वाढल्याने १० कुटुंबे त्यांचे घर सोडून निघून गेली होती परंतु शांतता बैठकीनंतर ते गावात परतले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अटक करण्यात आली होती. तर तिकडे गावात दुपारी ४ वाजेपर्यंत एका गटाने एका आरोपीच्या घराची तोडफोड करून आग लावली होती.
लाठ्या, रॉड आणि पेट्रोलने हिंसाचार करण्याचा प्रयत्न
हिंसाचाराची माहिती मिळाल्यानंतर गरियाबंद अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरेंद्र पटेल, उपविभागीय पोलीस अधिकारी निशा सिन्हा आणि राजीमचे पोलीस निरीक्षक अमृत साहू यांच्यासह ३४ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जमावात सुमारे ७० लोक होते. परंतु काही वेळाने जमावाने लाठ्या, रॉड आणि पेट्रोल आणल्याने इतर लोकही त्या जमावात सामील झाल्याने हा तणाव वाढला. घटनेचे माहिती मिळताच तासाभरात पोलिस अधीक्षक वेदव्रत सिरमौरही देखील घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनाही मारले
घटनास्थळी असलेल्या एका पोलिसाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “जमावाने आम्हाला काठ्यांनी मारले आणि आमच्या हातावर, पाठीवर आणि डोक्यावर वार केले. त्यांनी आमचे हेल्मेट तोडले आणि आमच्या वाहनांवर तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांवर दगडफेक केली. आमची संख्या कमी असल्याने आम्ही त्यांच्यावर लाठीमार केला नाही आणि कोणताही जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही त्यांना मदत केली.”
मदरशातील मुलांचीही सुटका
हल्ला सुरू असताना पोलिस पथकाने हल्ल्यातील घरांचे रक्षण केले आणि सुमारे २० लोकांना बसमध्ये सुरक्षित ठिकाणी नेले. “काही वेळाने आम्हाला फोन आला की सहा किंवा सात मुले एका मदरशात आहेत. आम्ही त्यांना पोलिस व्हॅनमध्ये नेले. मदरशावर हल्ला झाला नाही, परंतु त्याच्या बाहेर असलेल्या कूलरची तोडफोड करण्यात आली आणि एक दुचाकी आणि त्याच्या शेजारील घरे जाळण्यात आली,” असे पोलिसाने सांगितले.
हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी गावात १५० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. अनेक अज्ञात लोकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न, दंगल आणि जाळपोळीचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

