छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एका ५२ वर्षीय महिलेचा कीटकनाशक प्यायल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोबाईलवर रील्स पाहताना वारंवार इंटरनेट नेटवर्क खंडित झाल्याने महिला संतापली होती. त्यानंतर तिने मोबाईल फोन जमिनीवर फेकला आणि खोलीत जाऊन कीटकनाशक प्यायल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. मात्र, नेटवर्क खंडित होणे हेच या घटनेमागचे एकमेव कारण होते का, याचा तपास अद्याप सुरू आहे. महिलेच्या मृत्यूने तिच्या पतीसह तीन मुलांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
फोन फेकून खोलीत गेली
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, संबंधित महिला मोबाईलवर रील्स आणि टीव्हीवरील मालिका पाहण्यात बराच वेळ घालवत असे. शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजता ती जेवताना मोबाईलवर व्हिडीओ पाहत होती. त्याचवेळी अचानक मोबाईल नेटवर्क गेले. बराच वेळ प्रयत्न करूनही नेटवर्क पूर्ववत झाले नाही. त्यामुळे ती चिडली आणि संतापाच्या भरात तिने फोन जमिनीवर फेकला. त्यानंतर ती एका खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला.
१० मिनिटांनी बाहेर आली, मात्र प्रकृती बिघडली
सुमारे १० मिनिटांनी महिला खोलीबाहेर आली आणि व्हरांड्यात बसली. काही वेळातच तिला उलट्या होऊ लागल्या. तिची प्रकृती वेगाने खालावत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. सुरुवातीला तिला अचानक आजारपण आले असावे, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, खोलीची तपासणी केल्यानंतर तिथे कीटकनाशकाची रिकामी बाटली आढळली. त्यामुळे तिने कीटकनाशक प्यायल्याचा संशय कुटुंबीयांना आला.
उपचारादरम्यान मृत्यू
कुटुंबीयांनी महिलेला तातडीने करतला येथील आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला कोरबा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पतीने दिले शेणमिश्रित पाणी
महिलेचा पती रोजंदारीवर काम करतो. रुग्णालयात नेण्यापूर्वी पत्नीला उलटी व्हावी म्हणून त्याने तिला शेण मिसळलेले पाणी पाजल्याचे पोलिसांना सांगितले. स्थानिक समजुतीतून त्याने हा उपाय केल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याचा कोणताही फायदा झाला नाही आणि महिलेची प्रकृतीही सुधारली नाही.
नेटवर्कच कारण होते का? पोलिसांचा तपास सुरू
महिलेच्या मृत्यूमागे मोबाईल नेटवर्क खंडित होणे हेच कारण होते, असा निष्कर्ष पोलिसांनी अद्याप काढलेला नाही. घटनेपूर्वी नेमके काय घडले, महिलेची मानसिक अवस्था कशी होती आणि तिच्या टोकाच्या निर्णयामागे अन्य काही कारण होते का, याचा तपास केला जात आहे.
पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले असून आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. तपास अधिकारी तिच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
