पीटीआय, रायपूर
जानेवारी २०२४ पासून राज्यात ५३२ नक्षलवादी मारले गेले असून २००४ जणांना अटक करण्यात आली, तर २,७०० जणांनी शरणागती पत्करली, अशी माहिती छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी शुक्रवारी दिली. मार्चअखेरपर्यंत नक्षलवादाचा नायनाट करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
नक्षलवाद विरोधातील लढाईत सुरक्षा मोहिमा आणि पुनर्वसन प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण परिणाम मिळत आहेत. नक्षलवादाच्या विरोधात सरकारचा हेतू स्पष्ट असून ३१ मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद पूर्णत: संपवण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी काम करत आहोत, असे शर्मा म्हणाले.
हजारो शस्त्रास्त्रे जप्त जानेवारी २०२४ पासून सुरक्षा दलांनी अंदाजे १,१०० शस्त्रे जप्त केली आहेत, ज्यात एके-४७ रायफल्स, इन्सास रायफल्स, सेल्फ-लोडिंग रायफल्स, लाइट मशीन गन, मोर्टार आणि पिस्तूल यांचा समावेश आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षलवादी संघटनेचे सहा पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समिती सदस्य चकमकीत ठार झाले असून दोघांनी शरणागती पत्करली. या कालावधीत एकूण १७ विशेष विभागीय समिती सदस्य ठार झाले आणि सात जणांनी शरणागती पत्करली, तर एकाला अटक करण्यात आली, अशी माहितीही शर्मा यांनी दिली. जगदलपूर, सराईपली आणि शेजारील राज्यांमध्ये रेइडो प्रसारणाद्वारे शरणागती पत्करण्याचे आवाहन प्रसारित केले जात आहे.
सात पुनर्वसन केंद्रे
– राज्यात सात पुनर्वसन केंद्रे कार्यरत आहेत. आतापर्यंत, ४१० महिलांसह सुमारे १,७०० माजी नक्षलवाद्यांनी या केंद्रांमध्ये विविध कौशल्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, तर २३२ सध्या प्रशिक्षण घेत आहेत.
– बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा, वीज, पिण्याचे पाणी, रुग्णालये आणि अंगणवाड्यांसह विकास घडवून आणणे आणि प्रदेशाच्या प्रत्येक भागात संविधानाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे ध्येय आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
– धर्मांतराशी संबंधित ३८ प्रकरणांची २००१ ते २०२३ दरम्यान नोंद करण्यात आली, तर २०२४ ते २०२५ मध्ये ही संख्या वाढून ६७ झाली.
– आतापर्यंत ३४ बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले असून इतरांवर कारवाई सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शर्मा यांनी दिली.
