Chhattisgarh Naxal Attck on Bijapur Village : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांना पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून फाशी दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांचं एक विशेष पथक यासंदर्भात अधिकचा तपशील गोळा करत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. नक्षलवाद्यांनी मंगळवारी मिर्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जप्पेमार्का गावातून एका शालेय विद्यार्थ्यासह तीन गावकऱ्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर ‘जन अदालत’ आयोजित करून दोघांना झाडावर लटकवण्यात आले, तसेच शालेय विद्यार्थ्याला सोडून दिल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. मडवी सुजा आणि पोडियम कोसा अशी मृतांची नावे आहेत.

माओवाद्यांच्या भैरमगड एरिया कमिटीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून फाशी दिलेले दोघेही ‘पोलिसांचे खबरी’ म्हणून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे ही वाचा >> PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम

४ नक्षलवादी शरण

कांकेर हिंसाचाराच्या अनेक घटनांमध्ये सहभागी असलेल्या आणि १२ लाखांचे सामूहिक बक्षीस असलेल्या चार नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करल्याचे गुरुवारी पोलिसांनी सांगितले. चौघांपैकी सीताय कोर्रम ऊर्फ सुरजन्ना आणि लुक्कू पूनम ऊर्फ नरेश या दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.