छत्तीसगढमध्ये आज सकाळपासून (मंगळवार) दुस-या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्या सत्रात एकूण १५ टक्के मतदान झाले आहे. आकडेवारीनुसार यावेळी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
१९ जिल्ह्यांतील ७२ विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात मुख्यमंत्री रमन सिंहाच्या मंत्रिमंडळातील निम्म्या मंत्र्यांचं भविष्य पणाला लागलं आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचा मुलगा अरुण वोरा, अजित जोगी यांचा मुलगा अमित आणि पत्नी रेणू जोगी यांचं भवितव्य आज पेटीबंद होणार आहे.
छत्तीसगढच्या पहिल्या टप्प्यात अत्शय शांतीपूर्ण वातावरणात मतदान पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, नक्षल प्रभावित बस्तरमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान पार पडले आहे. तरीही सुरक्षेच्या बाबतीत सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच सरगुजा आणि रायपूरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पोलिस आधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या ७२ मतदान क्षेत्रात ८० हजारहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानात ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.
आज ८४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ज्यामध्ये ७५ महिला उमेदवार आहेत. निवडणुक आयोगातर्फे २० हजारहून अधिक निवडणुक कर्मचारी काम पाहत आहेत. व्हिडियो चित्रिकरणासाठी ७५ टीम ठेवण्यात आल्या आहेत. ४६७५ माक्रो ऑब्जर्वरची नियुक्ति करण्यात आली असल्याची माहिती निवडणुक आयोगातर्फे देण्यात आली आहे.  
छत्तीसगढमध्ये आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने नक्षल प्रभावित प्रदेशांमध्ये सुरक्षा दलांसाठी दहा अतिरिक्त डिजिटल सॅटेलाइट फोन टर्मिनलची व्यवस्था केली आहे. दूरसंचार विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातर्फे पूर्वीही डिजिटल सॅटेलाइट फोन टर्मिनल लावण्यात आले होते. परंतू सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता आणखी दहा टर्मिनल लावण्य़ाचा निर्णय घेण्यात आला आहे.  
८ डिसेंबर रोजी छत्तीसगढ विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.