छत्तीसगडच्या बलौदा बाजार जिल्ह्यातील ‘खारवे’ या अवघ्या १,००० लोकसंख्येच्या गावात गेल्या ५ महिन्यांत एकामागून एक ८ संशयास्पद मृत्यू झाले. सुरुवातीला गावकऱ्यांना वाटले की हा देवाचा कोप किंवा एखादा वाईट समज आहे, म्हणूनच त्यांनी गावात पूजा-अर्चाही केली. पण जेव्हा गावकऱ्यांनी या मृत्यूंचे धागेदोरे जोडायला सुरुवात केली, तेव्हा एका क्रूर सिरीयल किलरचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी २२ जून रोजी रामसहाय जयस्वाल वय ४६ नावाच्या स्थानिक किराणा दुकानदाराला या ८ जणांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

हत्येची भयानक पद्धत

आरोपी रामसहाय हा गावातच किराणा दुकान चालवायचा. तो दिसायला अत्यंत साधा, मनमिळाऊ आणि देवभक्त होता. पण पोलीस तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. तो आपल्या पिण्याच्या सोबत्यांना ‘गोवा’ नावाची स्थानिक दारू विनामूल्य किंवा सोबत पिण्यासाठी ऑफर करायचा. या दारूच्या बाटलीमध्ये तो ‘सुहागा’ नावाचे तीव्र उंदीर मारण्याचे विष मिसळायचा. हे विषारी मद्य प्यायल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत समोरच्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा.

मृत्यू नैसर्गिक वाटल्याने वाचत गेला आरोपी

फेब्रुवारी ते मे दरम्यान झालेल्या सुरुवातीच्या मृत्यूंना डॉक्टरांनी आणि गावकऱ्यांनी हृदयविकाराचा झटका किंवा नैसर्गिक मृत्यू समजले. यामुळे एकाही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. ७ फेब्रुवारी रोजी बद्री पटेल (वय ५८) यांचा रामसहायसोबत दारू प्यायल्यानंतर मृत्यू झाला. डॉक्टरांनी हार्ट अटॅक घोषित केले.

फेब्रुवारी ते मार्च मध्ये बुथलू साहू, छतुराम साहू आणि बुधराम जयस्वाल यांचाही अशाच प्रकारे अचानक मृत्यू झाला. पुढे ३१ मार्च रोजी ३८ वर्षीय विनोद साहू या तरुण आणि निरोगी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गावात चिंतेचे वातावरण पसरले. गावकऱ्यांनी याला अपशकुन मानून गावात तांत्रिकाला बोलावून पूजाही केली. एप्रिलमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला.

गुन्ह्याचा पर्दाफाश कसा झाला?

१४ मे रोजी ४० वर्षीय महेत्रू साहू एकदम ठणठणीत असताना नदीवर अंघोळीला गेला. तिथे रामसहायसोबत दारू प्यायल्यानंतर तो अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा सुरू केली. तेव्हा २३ वर्षीय कार्तिक कुंभार या मजुराने एक धक्कादायक गोष्ट सांगितली.

“काही दिवसांपूर्वी रामसहायने दिलेल्या दारूचे घोट घेताच मला उलट्या झाल्या आणि मी ५-६ तास बेशुद्ध पडलो होतो.” कार्तिकच्या या खुलाशानंतर गावकऱ्यांनी सर्व जुन्या मृत्यूंचे धागेदोरे जोडले. मृत पावलेले सर्वजण रामसहायसोबत दारू प्यायले होते हे स्पष्ट झाले. गावकऱ्यांनी ६ जून रोजी पोलिसांत तक्रार केली आणि अखेर २२ जूनला आरोपीला अटक झाली.

हत्येमागचे कारण काय?

पोलिसांच्या मते, आरोपी रामसहाय अत्यंत लहान-सहान गोष्टींवरून मनात राग धरून ठेवायचा. जमिनीचे वाद, उसने दिलेले पैसे न मिळणे, किरकोळ भांडणे आणि टोमणे मारणे यामुळे त्याने या हत्या केल्या. एका माजी सरपंचाने रामसहायच्या दुकानाशेजारी स्वतःचे दुकान सुरू केल्यामुळे रामसहायने त्याच्याशी बोलणेही बंद केले होते. आरोपीला वाटायचे की, त्याने गावासाठी खूप काही केले आहे, पण गावकरी त्याला योग्य तो मान देत नाहीत.

पोलिसांनी गुन्हा सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह थडग्यातून बाहेर काढून फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत, जेणेकरून विषबाधेचे पुरावे गोळा करता येतील. या घटनेनंतर आरोपीचे कुटुंब गाव सोडून गेले असून, संपूर्ण खारवे गावात सध्या भीती आणि शांततेचे वातावरण आहे.