पीटीआय, सक्ती (छत्तीसगड)
छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात मंगळवारी एका खासगी विद्युत प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन नऊ कामगारांचा मृत्यू झाला आणि अन्य १५ जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, सिंघीतराई गावातील वेदांता लिमिटेड विद्युत प्रकल्पामध्ये मंगळवारी दुपारी बॉयलरच्या नलिकेत स्फोट झाला, असे सक्तीचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी दिली.

या दुर्घटनेत तिघेजण जागीच ठार झाले तर सहा जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शेजारच्या रायगड जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. स्फोटानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याला सुरुवात केली. बॉयलरच्या आजूबाजूचा भाग अतिशय गरम असतो. त्या भागातून अन्य कामगार आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी आणखी कोणी अडकले आहे का याचा तपास उशिरापर्यंत सुरू होता.

राज्याचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून सरकार मृतांच्या कुटुंबीयांबरोबर असल्याचे सांगितले. या दुर्घटनेची चौकशी केली जाईल आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, जखमी झालेल्यांना शक्य ते सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. या घटनेची चौकशी केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.