सक्ती (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराई येथे ‘वेदांता लिमिटेड विद्युत प्रकल्पात मंगळवारी झालेल्या बॉयलर स्फोटातील मृतांची संख्या १७ झाली आहे. बॉयलरमधून टर्बाइनकडे उच्च दाबाने बाष्पाचे वहन करणाऱ्या पोलादाच्या नलिकेमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला. त्यामुळे अनेक कामगार गंभीररित्या भाजले गेले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर नऊ जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या स्फोटात एकूण ३६ कामगार भाजले होते, त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाल्याचे सक्तीचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी सांगितले. सध्या रायपूर आणि रायगड येथील रुग्णालयांमध्ये १९ जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो यांनी दिली. सर्व मृतांची ओळख पटली असून, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे. सर्व मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मृत कामगार छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश येथील आहेत.

मुख्यमंत्री विष्णू साई देव यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर ‘वेदांता पॉवर’ने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३५ लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी १५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दरम्यान, या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे.