अविवाहितांना भाजपमध्ये चांगले भविष्य असल्याचे छत्तीसगढचे क्रीडा मंत्री भय्या लाल रजवाडे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण देत रजवाडेंनी हे विधान केले. उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दीपक पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रजवाडे बोलत होते. ‘अविवाहितांना भाजपमध्ये चांगले भविष्य आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीदेखील अविवाहित आहेत, हेदेखील सर्वांना माहित आहे,’ असे रजवाडे यांनी म्हटले.
भाजपमधील अविवाहितांच्या भविष्याबद्दल रजवाडे भरभरुन बोलत होते. ‘भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री अविवाहित आहेत. उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्षदेखील अविवाहित आहेत,’ असे रजवाडे म्हणाले. रजवाडे यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. भय्या लाल रजवाडे याआधीही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार बन्सीलाल महतो यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानाबद्दल रजवाडे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता.




भाजप खासदार बन्सीलाल महतो यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिलांविरोधी विधान केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेसने सडकून टीका केली होती. ‘भाजपचे नेते जाहीरपणे महिलाविरोधी विधाने करत आहेत. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही’ अशी टीका त्यावेळी काँग्रेस आमदार अमित जोगी यांनी केली होती. लोकसभेत छत्तीसगढमधील कोरबा मतदारसंघाचे नेतृत्त्व करणाऱ्या महतो यांनी ४ ऑक्टोबरला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन केले होते. या कार्यक्रमात महिलांबद्दल बोलताना महतो यांची जीभ घसरली होती. यावरुन मोठी टीका झाल्यावर, आपण गमतीने ते विधान केल्याची सारवासारव महतो यांनी केली होती.