कुख्यात गुंड छोटा राजनला सोमवारी बनावट पासपोर्ट प्रकरणात दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायमूर्ती विरेंद्र कुमार गोयल यांनी हा निकाल दिला. गेल्यावर्षी ८ जुनला छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे याच्यासह पासपोर्ट अधिकारी जयश्री रहाटे, दीपक शहा , ललिता लक्ष्मणन यांच्यावर गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला होता. या सगळ्यांवर फसवणूक, खोटी सही करणे आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात छोटा राजन याला १९९९ साली बंगळुरूमधून मोहन कुमार या बनावट नावाने पासपोर्ट देण्यात आला होता. रहाटे, शहा आणि ललिता लक्ष्मणन यांच्या मदतीने राजनने हा पासपोर्ट तयार करवून घेतला होता.

सध्या छोटा राजन न्यायालयीन कोठडीत असून तीन दोषी अधिकारी जामिनावर बाहेर आहेत. छोटा राजन याच्या नावावर खंडणी, तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक आणि खुनाचे एकुण ८५ गुन्हे आहेत. २५ ऑक्टोबर २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात सोपविण्यात आले होते.

दरम्यान, छोटा राजन याने या खटल्याच्या सुनावणीदरम्यान दहशतवाद्यांशी लढण्यासाठी मदत करत असल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला बनावट पासपोर्ट तयार करून दिल्याचा दावा केला होता. १६ वर्षांपूर्वी दाऊदने मला बँकॉकमध्ये असताना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला मोहन कुमार या बनावट नावाने पासपोर्ट तयार करून दिल्याचे राजनने म्हटले होते. मी भारताच्या दहशतवादीविरोधी लढ्याचा आणि निष्पाप नागरिकांना मारणाऱ्या देशविरोधी घटकांविरुद्धच्या लढाईचा एक भाग होतो. मला मदत केलेल्या आणि देशाच्या भल्यासाठी मी मदत केलेल्या लोकांची नावे सांगू शकत नाही, असेही छोटा राजनने सांगितले होते.