अमेरिकेतील शिकागोमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या परेडवर गोळीबार कऱणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी इमारतीच्या छतावरुन रायफलने करण्यात आलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई करत २२ वर्षीय रॉबर्ट क्रिमो (Robert E Crimo III) याला अटक केली आहे. रॉबर्ट त्यावेळी परिसरातच होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

ABC News ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत पोलिसांनी कारला घेरलं असून यावेळी रॉबर्ट हात वर करत बाहेर येताना दिसत आहे. यानंतर तो खाली जमिनीवर बसतानाही दिसत आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलं जाईल असं हायलँड पार्क पोलिसांनी सांगितलं आहे.

अमेरिकेत बंदूक हिंसाचारप्रतिबंधक विधेयक मंजूर!; नवीन कायदा अनेक निष्पाप जीव वाचवेल : अध्यक्ष बायडेन

पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सहा लोकांचा मृत्यू झाला असून २४ जण रुग्णालयात दाखल आहेत. घटनास्थळावरुन रायफल जप्त करण्यात आली आहे.

अमेरिकेत बंदुकीचा वापर करत होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. २४ मे रोजी टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात १९ विद्यार्थी आणि २ शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर न्यूयॉर्कमध्ये १४ मे रोजी किराणा दुकानात झालेल्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला होता.

आपल्या मुलीसोबत परेडमध्ये सहभागी झालेल्या गार्सिया यांनी एबीसीसोबत बोलताना सांगितलं की, आपण अचानक गोळीबार ऐकला आणि थांबलो. काही वेळाने हा गोळीबार अजून वाढला. साक्षीदारांच्या माहितीनुसार, हल्लखोर एका छतावर होता आणि तेथून गर्दीवर गोळीबार केला.

अमेरिकेत बंदूक हिंसाचारप्रतिबंधक विधेयक मंजूर

अमेरिकेतील बहुप्रतीक्षित बंदूक हिंसाचार प्रतिबंधक विधेयकावर अध्यक्ष जो बायडेन यांनी २६ जूनला स्वाक्षरी केली. अमेरिकेत बेछुट गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने प्रतिबंधासाठी वैधानिक तरतूद करण्याच्या मागणीचा दबाव सरकारवर वाढला होता. ‘‘यामुळे निष्पाप जीव वाचतील,’’ असे उद्गार बायडेन यांनी काढले होते. बायडेन यांनी सांगितलं होतं, की या दुर्घटनांमुळे ठोस कृती करण्याची गरज होती. तशी व्यापक मागणीही होत होती. आज आम्ही त्या दिशेने पाऊल टाकले आहे.