भारतीय बीएफएसआय BFSI क्षेत्राला जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी प्रोत्साहन देत असताना मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी काही सल्ले देखील दिले आहे. सुब्रमण्यम म्हणाले की, जगातील टॉप १०० बँकांमधील किमान सहा बँका या भारतातील असायला हव्यात. याचसोबत, आपल्या बँका भारतात सिंह पण जगात शेळ्या असल्याचं म्हणत हे चित्र बदलण्याची गरज असल्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

ईटीबीएफएसआय (ETBFSI) शिखर परिषदेत मुख्य भाषण देताना कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले कि, “हा आपल्या मानसिकतेचा प्रश्न आहे. फक्त आपल्या घरी (देशात) आपण सिंह आणि बाहेर (जागतिक स्तरावर) शेळी अशी मानसिकता ठेवून आपल्याला चालणार नाही. याउलट आपल्याला बाहेरसुद्धा सिंहच असायला आवडेल, अशी आपली मानसिकता असायला हवी.”

जगातील टॉप १०० बँकांमध्ये भारताची एकच बँक

सद्यस्थितीत जगातील टॉप १०० बँकांमध्ये भारताची एकच बँक आहे. SBI ही जगात ५५ व्या स्थानावर आहे. सुब्रमण्यम पुढे म्हणाले की, आपल्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी जगातील टॉप १०० बँकांमध्ये मध्ये भारताच्या किमान सहा बँका असाव्यात. तर त्यापैकी काही टॉप १० किंवा टॉप २० मध्ये असायला हव्यात. “बीएफएसआय क्षेत्राला जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त करून देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या आकांक्षा वाढवण्याची गरज आहे”, असंही सुब्रमण्यम यावेळी म्हणाले.

BFSI क्षेत्र हे १९९० च्या भारतीय क्रिकेट संघासारखं

क्रिकेटचं उदाहरण देत सुब्रमण्यम म्हणाले की, भारतीय बीएफएसआय क्षेत्र हे सध्या १९९० च्या भारतीय क्रिकेट संघासारखं दिसत आहे. १९९० चा क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावर अनेकदा विजय मिळवू शकत होता. परंतु. त्याने जागतिक स्तरावर लक्षणीय अशी कामगिरी केली नाही. म्हणूनच या क्षेत्राला आता सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्त्वाखालील क्रिकेट टीमसारखं बनण्याच्या दिशेने पावलं टाकली पाहिजेत. ज्यामुळे ते जागतिक स्तरावर आपली अशी एक ओळख निर्माण करू शकतील.

सुब्रमण्यम यावेळी असंही म्हणाले की, “देशात मोठे कॉर्पोरेट्स आणि कर्जदार आहेत. जे कर्ज घेतात, परंतु ते फेडत नाहीत. तरीही प्रत्यक्षात अनेक वेळा बँका थकबाकीदारांनाच कर्ज देतात.” त्याचसोबत पुढे ते म्हणाले कि, “देशात सातत्याने प्रगती करत करून अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या अधिकाधिक बँका असणं हेच भारतीय बीएफएसआय क्षेत्राचं उद्दिष्ट असणं अपेक्षित आहे.”