मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीही विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत - सुप्रिया सुळेंचा आरोप | Chief Minister and Deputy Chief Minister never take opposition parties into confidence Supriya Sule alleges msr 87 | Loksatta

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीच विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत” ; सुप्रिया सुळेंचा आरोप!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधला संवाद, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीच विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत” ; सुप्रिया सुळेंचा आरोप!
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज(शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत सध्या उफाळून आलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजाबाबत करण्यात आलेले विधान, याशिवाय भाजपा नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत तक्रार करण्यात आली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, “मी पहिल्या दिवसापासून म्हणते आहे, ज्या दिवशी ही घटना झाली. त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. ही मागणी मी पहिल्या दिवसापासून करते आहे. तुमच्या(प्रसारमाध्यम) माध्यमातून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते आहे. कारण, अगोदर जेव्हा अशा घटना झाल्या तेव्हा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नेहमी पक्षपात न करता राज्य पहिलं मानून, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेत सगळ्यांनी एकत्रपणे महाराष्ट्राचे प्रश्न मांडले. पंरतु आताचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, हे कधीही आणि कुठेही विरोधी पक्षांना विश्वासात घेताना, राज्याच्या हितासाठी कुठलीही कृती करताना दिसत नाहीत.”

याशिवाय, “ज्या पद्धतीने जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विरोधात बोलत होते, तेव्हा सुरुवातीच्या २४ तासांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणंही आलं नव्हतं.त्यामुळे दुर्दैवं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कुठलीही भूमिका घेत नाहीत, जेव्हा महाराष्ट्राचा, छत्रपतींचा अपमान होतो, जेव्हा महात्मा फुलेंचा अपमान होतो. या गोष्टी जेव्हा होतात, हे पाप जेव्हा घडतं तेव्हा नेहमीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याची पाठराखण करतात हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे.” असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:26 IST
Next Story
Uniform Civil Code: “एका पुरुषाने चौघींशी लग्न करणं…”; समान नागरी कायद्याबद्दल बोलताना मुस्लिमांचा उल्लेख करत गडकरींचं विधान