पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीबाबत देखील सूचक संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दोन महिन्यात तिसऱ्यांदा आमदारांना दिल्लीला बोलावलं”

राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत आपल्या राजकीय भवितव्याविषयी देखील सूतोवाच केले. मात्र, त्याआधी त्यांनी काँग्रेस हायकमांडविषयी देखील नाराजी व्यक्त केली. “मी सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो होतो. त्यांना सांगितल होतं की मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा हे होतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. मला वाटतं की माझ्यावर त्यांना संशय आहे की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय”, असं अमरिंदर सिंग यावेळी म्हणाले.

 

“आता त्यांना वाटेल त्याला मुख्यमंत्री करतील”

दरम्यान, आपल्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हव्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावं, अशा शब्दांत अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. “दोन महिन्यांत तीन वेळा तुम्ही आमदारांना दिल्लीला बोलवलं. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता ज्यांच्यावर त्यांना विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील. जे काही कारण असेल, त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला. ठीक आहे”, असं ते म्हणाले.

 

राजकीय भवितव्याविषयी सूतोवाच…

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. खुद्द अमरिंदर सिंग यांनी याविषयी स्पष्ट अशी कोणती भूमिका मांडली नाही. मात्र, तरीदेखील त्यांनी आपल्या भावी राजकीय वाटचालीविषयी सूचक विधान केलं आहे. “माझ्याकडे भावी वाटचालीसाठी नेहमीच पर्याय असणार आहेच. त्याविषयी मी भविष्यात निर्णय घेईन. मला ५२ वर्ष राजकारणात झाली आहेत. त्यातली ९.५ वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि नंतर पुढचा निर्णय घेईन”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister captain amrinder singh resigns says will decide future course of action pmw
First published on: 18-09-2021 at 16:59 IST