Nitish Kumar Resign : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. नितीश कुमार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आहे. मात्र, नितीश कुमार राज्यसभेचे सदस्य झाले असले तरी अद्याप त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. पण आता नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची तारीख जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली असून १४ एप्रिलनंतर बिहारला नवे मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपासाठी मार्ग मोकळा होणार आहे. या घडामोडींबाबत कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. मात्र, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
नितीश कुमार यांचं पाटणाच्या राजकीय पटलावरून निवृत्त होणं हा एक मोठा ऐतिहासिक बदल मानला जात आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणातील ही मोठी घडामोड मानली जात असून मागील काही दिवसांपासून सत्तांतराच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे आता लवकरच त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
बिहारच्या राजकारणात हालचालींना वेग
“नवीन मुख्यमंत्र्याची निवड एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत होईल. नितीश कुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर राजीनाम्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. नितीश कुमार राजीनामा देण्यासाठी सकारात्मक असून त्यांच्यावर कोणताही दबाव दिसत नाही”, असं जेडी(यू)च्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्वाची बैठक या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. या बैठकीत पक्षाची भविष्यातील वाटचाल आणि काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती जेडी(यू)च्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. तसेच नितीश कुमार यांचे पूत्र निशांत कुमार यांनीही नुकताच पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षातील त्यांची भूमिका आणि पद याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण?
दरम्यान, नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम असला तरी लवकरच याबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
