भारतात आयसिससाठी भरती करणारा अबू युसूफ अल हिंदीचा सीरियात मृत्यू झाला. अबू युसूफ अल हिंदी हा मूळचा कर्नाटकमधील भटकळचा असून छोटे मौला, अंजान भाई या नावानेही त्याला ओळखले जायचे. अमेरिकेनेही अबू अल हिंदीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

भारतात आयसिससाठी भरती करण्याचे काम अबू अल हिंदीकडे होते. भारतासह श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमधील मुस्लिम तरुणांना फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून गाठून त्यांचे ब्रेनवॉश करायचे आणि आयसिसमध्ये भरती करुन घ्यायचे काम तो करत होता. अबू अल हिंदी हा कर्नाटकच्या भटकळ गावातील निवासी होता. आयसिसमध्ये छोटे मौला, अंजान भाई या नावाने तो ओळखला जायचा. अबू अल बगदादीचा तो निकटवर्तीय होता असे समजते.

अबू अल हिंदी आयसिसमध्ये भरती झाल्याचे २०१३ मध्ये समोर आले आले होते. यासीन भटकळला भारतातील सुरक्षा यंत्रणांनी नेपाळच्या सीमारेषेवरुन अटक केली होती. यासीनने चौकशीत अबू अल हिंदी आयसिसमध्ये सामील झाल्याचे सांगितले. अमेरिकेनेही काही महिन्यांपूर्वी अबू अल हिंदीला जागतिक दहशतवादी म्हणून  घोषित केले होते. मोहम्मद शफी अरमार असे त्याचे नाव होते. ३० वर्षांच्या अबू अल हिंदीचा कुर्दीश जवानांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. आयसिसच्या अधिकृत वाहिनीवर अल हिंदीच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. अबू अल हिंदी आणि ऑस्ट्रेलियातून आयसिसमध्ये भरती झालेल्या अबू फहादचाही मृत्यू झाला.

अबू अल हिंदीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा यापूर्वीही करण्यात आला होता. मात्र यानंतरही गुप्तचर यंत्रणांना अबू अल हिंदीच्या हालचालीची माहिती मिळायची आणि तो जीवंत असल्याचे स्पष्ट व्हायचे. मात्र आता आयसिसनेच त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.