दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण असतो. अनेकजण फटाके, आतशबाजी करत या सणाचा आनंद लुटतात. पण काही वेळा आपला निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. फटाके घेताना काळजी घेणं किती गरजेचं आहे, हे या उदाहरणावरुन आपल्याला कळेलच. गुजरातमधल्या एका तीन वर्षांच्या मुलाने फटाका गिळल्याने त्याचा बळी गेला आहे.

काय घडलं नक्की?

गुजरातमधल्या सूरत इथल्या डिंडोली भागात राहणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याला जुलाबाचा त्रासही सुरू झाला. त्यानंतर त्याचे वडील त्याला दवाखान्यात घेऊन गेले. मुलाच्या आईने डॉक्टरांना सांगितलं की या मुलाने फटाका गिळला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या मुलावर उपचारही सुरू केले. मात्र, त्याला वाचवण्यात डॉक्टरही अपयशी ठरले.

दोन दिवस डॉक्टर या मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते अयशस्वी ठरले. या मुलाचं पूर्ण शरीर काळंनिळं पडलं होतं आणि दोन दिवसांनंतर या चिमुकल्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी या मुलाच्या रक्ताचा नमुना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. याचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल.

फटाक्यांमध्ये असणारे स्फोटक घटक रक्तात मिसळल्याने या मुलाचं शरीर काळंनिळं झालं होतं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.