आईच्या हातातून निसटल्याने एका दीड महिन्याच्या बाळाचा इमारतीच्या गच्चीवरुन पडून मृत्यू झाला. चेन्नईत पश्चिम मामबालामध्ये थुक्काराम मार्गावर ही दुर्देवी घटना घडली. मृत बाळाचे नाव मुथुराज असून तो अवघ्या दीड महिन्यांचा होता. या बाळाची आई माहेश्वरी कपडे वाळत घालण्यासाठी म्हणून गच्चीवर गेली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. मुथुराज २० फूटावरुन खाली पडल्याने त्याला जबर मार लागला होता असे पोलिसांनी सांगितले.

मुथुराज खाली पडल्यानंतर माहेश्वरी आणि शेजाऱ्यांनी लगेच त्याला जवळच्या राजीव गांधी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी मुथुराजवर शस्त्रक्रिया केली. पण मुथुराजने उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर १४ तासांनी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांना माहिती देताना माहेश्वरीने सांगितले कि, मुथुराजला अंगावर घेऊन कपडे वाळत घालत असताना त्याने पटकन लाथ मारली. त्यामुळे नियंत्रण सुटले आणि मुथुराज खाली पडला. दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने मुथुराजच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

ही दुर्घटना घडली त्यावेळी माहेश्वरीचा नवरा कन्नन घरी नव्हता. तो कामासाठी बाहेर गेला होता. हे दोघे पती-पत्नी भाडयाच्या घरात राहतात. मुथुराज खाली पडल्यानंतर माहेश्वरीने हंबरडा फोडला तो ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. डॉक्टरांच्या पथकाने मुथुराजचा रक्तस्त्राव थांबवून त्याला वाचवण्यासाठी लगेचच शस्त्रक्रिया केली. पण मुलाची प्रकृती अधिक खालवली व अखेर त्याने बुधवारी सकाळी प्राण सोडला.