देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सिद्ध करणारी एक घटना नुकतीच केरळमध्ये घडली आहे. धावत्या गाडीतून जंगलातील धोकादायक रस्त्यावर खाली पडलेलं एक बाळ चमत्कारिकरित्या सुखरुप सापडलं असून काही तासांनी पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाकडे पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे आपलं बाळ गाडीतून खाली पडलं आहे याची त्याच्या आईला कल्पनाच नव्हती. बाळ सुखरुप असल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

रोहिता असं या चिमुरडीचं नाव आहे. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास राजमाला येथे चेकपोस्टजवळ असताना ती आपली आई सत्यभामाच्या मांडीवरुन खाली पडली. कुटुंब तामिळनाडू येथील पलानी मंदिराला भेट दिल्यानंतर कुटुंब घरी चाललं होतं. महत्त्वाचं म्हणजे ४० किमी अंतर पार करुन मुल्लारीकुडी येथील आपल्या घरी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांना बाळ गाडीत नसल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाळ रस्त्यावर पडलेलं दिसत आहे. पडल्यानंतर बाळ रस्त्यावर रांगताना दिसत आहे. सुदैवाने बाळ जिथे थांबलं ती वनखात्याची चेकपोस्ट होती. या रस्त्यावर जंगली प्राण्यांचा वावर असतो अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“सुदैवाने बाळ प्रकाशाच्या दिशेने रांगत आलं. जर बाळ दुसऱ्या बाजूला गेलं असतं तर खड्ड्यात पडलं असतं,” अशी माहिती मुन्नार वन्यजीव विभागाच्या वॉर्डन आर लक्ष्मी यांनी दिली आहे. चेकपोस्टने संपर्क साधला असताना लक्ष्मी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.
“बाळाच्या डोक्याला आणि हाताला जखमा झाल्या होत्या. ते सारखं रडत होतं. सीसीटीव्ही तपासं असता बाळ चालत्या जीपमधून पडलं असल्याचं लक्षात आलं. आम्ही मुन्नार पोलीस आणि कंट्रोल रुमला याची माहिती दिली. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही बाळाला कुटुंबाकडे सोपवलं,” अशी माहिती लक्ष्मी यांनी दिली आहे.