बंगळुरूमध्ये एका शाळेत अवघ्या साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलीच्या गुप्तांगावर जखम आढळून आली असून तिने कथन केलेल्या परिस्थितीची सांगड घालता हा लैंगिक अत्याचारच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बंगळुरूमध्ये अशा प्रकारे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याची ही गेल्या चार महिन्यांतील तिसरी घटना आहे.
बंगळुरूमधील ‘ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल’मध्ये मंगळवारी ही घटना घडली. घटनेची माहिती कळताच शाळेतील पालकवर्ग मोठय़ा संख्येने शाळेत येऊन धडकला. पोलिसांनी शाळेतील कर्मचाऱ्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले असून सीसीटीव्हीचे चित्रीकरणही ताब्यात घेतले आहे. या मुलीच्या गुप्तांगावर छोटीशी जखम आढळून आल्याचे तिची तपासणी करणाऱ्या एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर त्या मुलीनेही आपल्याबाबत काय घडले यासंबंधी निवेदन दिले आहे. या दोन्हींचा विचार करता हा लैंगिक अत्याचाराव्यतिरिक्त अन्य काही प्रकार असल्याचे सध्या तरी म्हणता येणार नाही, असे शहर पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी मोठय़ा प्रमाणावर तपास मोहीम हाती घेतली असून बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याखाली (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी या मुलीला घेण्यासाठी तिची आई शाळेत आली तेव्हा ती रडत होती. तसेच नंतर घरी गेल्यावरही तिचे वागणे नेहमीपेक्षा वेगळे होते. तिला तापाची लक्षणे जाणवत होती. आपल्याला कोणीतरी मारले, असे तिने सुरुवातीला आईला सांगितले. परंतु नंतर तिने नेमके काय झाले ते आईला सांगितले.
या संदर्भात पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेच धागेदोरे लागलेले नाहीत. हा प्रकार नेमका कुठे घडला आहे, शाळेच्या परिसरात की बाहेर हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही सर्व शक्यता विचारात घेऊन तपास करीत आहोत, अशी ग्वाही रेड्डी यांनी दिली.