Pakistani Hindu Refugees Indian Citizenship: “लोक नेहमीच आमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आले आहेत. ‘हे पाकिस्तानातून आले आहेत, दहशतवादीही असू शकतात,’ अशी कुजबुज सतत आमच्या कानावर पडत असते. आम्हाला कुणी भाड्याने घरही देत नव्हते. कित्येक पावसाळे आम्ही डोक्यावर छप्पर नसताना उघड्यावर काढले आहेत,” अशा शब्दांत ३१ वर्षीय राजनंदिनी उर्फ सावी यांनी भारतात आल्यानंतरच्या संघर्षाची दाहक कथा ऐकवली. २००८ मध्ये पाकिस्तानच्या कराची येथून ५०-६० लोकांच्या समूहासह एकल माता असलेल्या राजनंदिनी आपल्यातीन मुलांसह भारतात आल्या होत्या. द इंडियन एक्सप्रेसने स्थलांतरितांना भारतात मिळालेली वागणूक आणि आता त्यांच्या भावना काय आहेत? हे जाणून घेतले.

अहमदाबाद येथे मंगळवारी आयोजित एका विशेष कार्यक्रमात १५८ निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यात नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) १२६, तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३२ लाभार्थ्यांचा समावेश होता. या वेळी व्यासपीठावरून गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी राजनंदिनीच्या जिद्दीचा विशेष उल्लेख केला.

करोनाकाळात पती राजेंद्र उर्फ बाबूर यांचे निधन झाल्यानंतर राजनंदिनीला भारतात कोणीही नातेवाईक नसल्याने पाकिस्तानात परतण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता. तिचे आई-वडील, आठ बहिणी आणि तीन भाऊ पूर्व कराचीतील चानेसर गोठ येथे राहतात. मात्र, त्यांनी परतण्यास ठाम नकार दिला. शिलाईचे काम करून मुलांचा सांभाळ केला आणि अखेर त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. “इथे कितीही अडचणी असल्या तरी सीमेपलीकडील स्थिती त्याहून भयावह आहे. कराचीला परत जाऊन मला माझ्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते,” असे त्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

pakistani hindu refugees indian citizenship challenges
राजनंदिनी आणि सरस्वती (Express photo)

‘लहान मुलंही आम्हाला पाकिस्तानी म्हणतात’

याच सभागृहात ३५ वर्षीय पूनम गिहारा आपली २२ वर्षांची मुलगी केशर आणि जावई रोहन यांच्या समवेत नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत बसल्या होत्या. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या पूनम २०१३ मध्ये ७० नातेवाइकांसह भारतात आल्या होत्या. राजस्थानमधील मुनाबाव आणि जोधपूरमार्गे त्या दिल्लीतील गुरुद्वारात राहिल्या आणि नंतर अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्या.

भारतातील अनुभवांबद्दल बोलताना पूनम म्हणाल्या, “आम्हाला आजही सतत टोमणे सहन करावे लागतात. अगदी लहान मुलंही थेट तोंडावर आम्हाला ‘पाकिस्तानी’ म्हणतात. पण आम्ही भांडत बसण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत करतो.” भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर या परिस्थितीत काही बदल होईल, असे वाटते का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “कुत्रे भुंकत राहतात, आपण त्याकडे लक्ष देऊन विचलित व्हायचे नसते.”

पाकिस्तानात बालविवाह

राजनंदिनी आणि तिची बालमैत्रीण सरस्वती उर्फ कंवल (३१) यांच्या बालपणीच्या वेदना समान आहेत. दोघीही राजस्थानच्या मूळ ‘गिहारा राजपूत’ या भटक्या समाजातील आहेत; ज्यांचे पूर्वज फाळणीनंतर सिंध प्रांतात स्थायिक झाले होते. मुली वयात आल्याचे कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून तिथे कमी वयातच लग्न लावून देण्याची प्रथा होती. परिणामी, २००८ मध्ये अवघ्या १३ व्या वर्षी भारतात आल्या तेव्हा त्या दोघीही विवाहित होत्या. राजनंदिनीचे लग्न वयाच्या १२ व्या वर्षी झाले होते, तर पूनम यांचे लग्न वयाच्या १५ व्या वर्षी झाले.

distribution of citizenship certificates in Ahmedabad
अहमदाबाद येथे भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करताना गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि इतर लोक. (Express photo)

कराचीतील दहशतीचे सावट

पाकिस्तानातील हिंदू महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना राजनंदिनी म्हणाल्या, “चानेसर भागात महिलांचे अपहरण आणि बलात्काराच्या घटना वारंवार घडत. टोळ्या उघडपणे बंदुका रोखून धाक दाखवत. गँगवॉर आणि पोलिसांचे अश्रुधूर नित्यनियमाचे झाले होते.”

सरस्वती यांनी सांगितले, “तिथे बाहेर पडताना चेहरा झाकावा लागायचा. घरात वायरमन किंवा प्लंबर आला तरी आम्हाला खोलीत डांबून ठेवले जाई. अपहरणाच्या भीतीने मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. भेदभाव टाळण्यासाठी आमच्या परिचयातील प्रत्येकाचे एक हिंदू आणि एक मुस्लिम असे दुहेरी नाव ठेवले जायचे.” पूनम यांची कन्या केशर हिलाही पाकिस्तानात हिंदू असल्यामुळे शाळेत हिणवले गेले, ज्यामुळे तिचे शिक्षण केवळ पाचवीपर्यंतच होऊ शकले.

‘मोकळ्या हवेत चहा पिण्याचे स्वातंत्र्य’

कराची आणि अहमदाबादमधील फरकावर बोलताना दोघी भावूक झाल्या. “तिथे अगदी लहान वयातही गुदमरल्यासारखे वाटायचे. वडिलांशिवाय किंवा भावाशिवाय घराबाहेर पडण्याची सोय नव्हती. पण अहमदाबादमध्ये मोकळेपणा मिळाला. रस्त्यावर मोकळेपणाने फिरणे, पावसाचा आनंद घेणे आणि टपरीवर उभे राहून चहा पिणे… या साध्या गोष्टीही आमच्यासाठी अत्यंत नवीन आणि मुक्त करणाऱ्या होत्या.”