नवी दिल्ली : भारतीय कंपनीने तयार केलेल्या खोकल्याच्या औषधामुळे पश्चिम आफ्रिकेतील गाम्बिया या देशात ६६ मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही शंका उपस्थित केल्यानंतर हरियाणा सरकारने या औषधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गाम्बियामधील बालकांच्या मृत्यूचा तपास करताना किमान चौघांच्या नमुन्यांमध्ये दूषित आणि कमी दर्जाचे खोकल्याचे औषध आढळून आले आहे. हे औषध हरियाणाच्या सोनिपतमधील मेडन फार्मास्युटिकल्स कंपनीने तयार केले आहे. याबाबत माहिती मिळताच कंपनीतील औषधाचे नमुने कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी सांगितले. या कंपनीमार्फत बनवण्यात येणाऱ्या औषधांना केवळ निर्यातीची परवानगी असून भारतात औषधे विकली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने आतापर्यंत केवळ गाम्बियामध्येच निर्यात केली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

अपुरी माहिती?

जागतिक आरोग्य संघटनेने गाम्बियातील सर्व ६६ मृत्यूंबाबत व्यक्तिगत माहिती दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ चार नमुन्यांचे परीक्षण अहवाल देण्यात आले असून त्याआधारे भारतात तपासाला मर्यादा आहेत. मात्र प्राथमिक चौकशी म्हणून औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासणीत कंपनीकडे औषध निर्मिती आणि निर्यातीचे सर्व परवाने असल्याचेही स्पष्ट झाले आहे.