China Technical Help Pakistan Operation Sindoor: भारताने पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत पहिल्यांदाच मोठा खुलासा समोर आला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी चीनने पाकिस्तानला तांत्रिक मदत देऊ केल्याची जाहीर कबुली दिली आहे. दहशतवादी तळांना लक्ष्य करणाऱ्या भारताच्या लष्करी कारवाईला वर्ष पूर्ण होत असताना हा मोठा खुलासा चीनकडून करण्यात आला आहे. ज्या चिनी अभियंत्याने पाकिस्तानला मदत केली त्याच व्यक्तीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.
अभियंत्याकडून खुलासा
झांग हेंग असे या अभियंत्याचे नाव आहे. चायना एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनच्या (AVIC) चेंगडू एअरक्राफ्ट डिझाइन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील अभियंता असून त्यांनी सीसीटीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. भारताच्या २०२५ च्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान चीनकडून पाकिस्तानला करण्यात आलेल्या सहकार्याचा खुलासा झांग यांनी केला. चेंगडूमधील ही चिनी संस्था चीनची प्रगत लढाऊ विमाने आणि मानवरहित हवाई वाहने विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावते.
पाकिस्तानला तांत्रिक मदत
पाकिस्तानला तांत्रिक मदत पुरविण्यात आली त्या टीमचा भाग असल्याची माहिती झांग यांनी दिली. मे महिन्यात भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षात पाकिस्तान हवाई दलाला तांत्रिक मदत केल्याची माहिती झांग यांनी मुलाखतीत दिली. सपोर्ट बेसवर आम्हाला लढाऊ विमानांच्या उड्डाण आणि हवाई हल्ल्याच्या सायरनचा आवाज वारंवार ऐकू येत होता,” असे झांग यांनी सीसीटीव्हीला सांगितले. या मुलाखतीत करण्यात आलेले महत्वाचे खुलासे हाँगकाँगस्थित दैनिक ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ (SCMP) मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
चीन – पाकिस्तान मैत्री
चीन आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकालीन घनिष्ठ लष्करी भागीदारी आहे. भारताच्या लष्करी कारवाईवेळी पाकिस्तानला केवळ लष्करी सामग्रीनेच नव्हे, तर गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातूनही पाठिंबा दिल्याची कबुली चीनच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने दिली होती. चिनी बनावटीच्या जे-१०सीई लढाऊ विमानाबाबत भाष्य करताना झु डा या अभियंत्याने “आम्ही व्यवस्थित डिझाईन करुन दिलेल्या विमानाची आता मोठी चाचणी होत आहे”, असे म्हणाले.
चिनी तंत्रतज्ञानाचा वापर
विशेष म्हणजे, पाकिस्तान चीनकडून मिळालेले जे-१०सीई लढाऊ विमानाचा वापर करते. एव्हीआयसी (AVIC) च्या उपकंपनीद्वारे उत्पादित, जे-१०सीई मध्ये ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे (AESA) रडार आहे आणि ते पीएल-१५ (PL-15) सह अत्याधुनिक चीनी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानकडून पीएल-१५ चा वापर करण्यात आला होता.
