सत्यता पडताळून न पाहता प्रसिध्द केलेला मजकूर, खास करून सोशल मीडियावरील अशा प्रकारचा मजकूर ऑनलाइन मीडियावर प्रकाशित करण्यावर चीन सरकारकडून प्रतिबंध लावण्यात आला आहे. निराधार वृत्त प्रकाशित केल्याबद्दल यावर्षी चीनमधील इंटरनेट नियमन मंडळाद्वारे देशातील अनेक संकेतस्थळांना दंड ठोठावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या आधारे ऑनलाइन मीडियावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या वृत्ताची प्रथम सत्यता पडताळून पाहावी, असे चीनच्या इंटरनेट नियमन मंडळाने बजावले आहे. चीनच्या सायबरस्पेस प्रशासनाद्वारे (सीएसी) जारी करण्यात आलेल्या नोटिशीनुसार न्यूज वेबसाइट्सनी स्रोताचा उल्लेख करणे अनिवार्य असल्याचे सरकारी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. निराधार वृत्त प्रसिध्द करणे आणि वास्तवाशी छेडछाड करण्यावर प्रतिबंध लावण्यात आल्याचेदेखील या नोटिशीत म्हटले आहे. सीएसीने यावर्षी ‘एसआईएनए डॉट कॉम’, ‘आईएफईएनजी डॉट कॉम’, ‘163 डॉट कॉम’सह अनेक प्रमुख वेबसाइट्सना निराधार वृत्त प्रसिध्द केल्याबद्दल दंड केला आहे.