पीटीआय, बीजिंग
भारताशी संबंध सुधारण्याचे धोरण कायम आहे, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही असा खुलासा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी केला. अरुणाचल प्रदेशमधील काही जागांची नावे चीनने बदलल्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र, आपल्या या कृतीचे समर्थन करत भारताशी संबंध चांगले ठेवायचे आहेत, असे चीनने मंगळवारी सांगितले.
भारतीय भूभागातील नावांनी काल्पनिक नावे देण्याच्या चीनच्या प्रयत्नावर भारताने रविवारी जोरदार टीका केली होती. अशा प्रकारचे कृत्य हे चीनचे निराधार कथन तयार करण्याचे प्रयत्न आहेत मात्र, त्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते. तसेच अशा प्रकारांमुळे द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते असा इशाराही जयस्वाल यांनी दिला होता.
चीन अक्साई चीनमध्येही तिसरा नवा प्रशासकीय देश स्थापित करत आहे, त्यावरही भारताने आक्षेप घेतला आहे. अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भारताची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मात्र, हा चीनचा भूभाग आहे, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी केला.
