भारत आणि चीन सीमाप्रश्न योग्य पद्धतीने हाताळत असून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील चर्चेतून झालेल्या एकमतानुसार सीमेवरील वातावरण निवळण्यासाठी दोन्ही देश कृती करीत आहेत, असे चीनच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
लडाखच्या पूर्वेकडे भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे ते सैन्य मागे घेण्याबाबत भारत आणि चीनच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने वरील बाब स्पष्ट केली.
तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी कोणती कारवाई केली त्याबाबतच्या सविस्तर तपशिलाबाबत विचारले असता प्रवक्त्याने आपल्याकडे सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. दोन्ही देश परिणामकारक संपर्क ठेवून राजनैतिक आणि लष्करी स्तरावर योग्य पद्धतीने प्रश्न हाताळत आहेत, दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे आणि त्यानुसार दोन्ही देश तणाव कमी करण्यासाठी कारवाई करीत आहेत, असे प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, बुधवारी जवळपास साडेचार तास झालेल्या चर्चेच्या वेळी भारताने, पांगोंग त्सो यासह अनेक परिसरात असलेले सैन्य त्वरित मागे घेऊन चीनने जैसे थे स्थिती ठेवावी, असा आग्रह भारताने धरला.
