एपी ; ब्रिटनच्या पार्लमेंटचे कनिष्ठ सभागृह ‘हाउस ऑफ कॉमन्स’चे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यदर्शन समारंभास (लाईंग इन स्टेट) उपस्थित राहण्यास चीनच्या प्रतिनिधी मंडळाला परवानगी नाकारली आहे. ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
‘बीबीसी’ आणि ‘पोलिटिको’ने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील उईघुर मुस्लीम अल्पसंख्याकांवर चीन अत्याचार करत असल्याचा आरोप पाच ब्रिटिश पार्लमेंट सदस्यांनी केला होता. त्यामुळे चीनने त्यांच्यावर निर्बंध लादले होते. या पार्श्वभूमीवर चीनला ही परवानगी नाकारण्यात आली आहे. महाराणींचे पार्थिव वेस्टमिन्स्टर येथील सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे. या प्रथेला ब्रिटिश राजघराण्यातील परंपरेनुसार ‘लाइंग इन स्टेट’ असे म्हणतात. महाराणींच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १९) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्याची चीनला परवानगी असेल, असे वृत्तही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र, पार्लमेंट संकुलाच्या आत अंत्यदर्शन समारंभास उपस्थित राहण्याची अनुमती चीनला नाकारण्यात आली आहे. वेस्टमिन्स्टर सभागृह हा ब्रिटिश पार्लमेंट संकुलाचा भाग आहे. हा भाग ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि‘‘हाऊस ऑफ लॉर्डस’च्या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असतो. चीनला केलेल्या या प्रतिबंधांमुळे ब्रिटन व चीनचे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



