दक्षिण चीन सागरातील तीन तळांवर चीनने युद्धनौकांविरोधी क्रूज मिसाईल्स आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टीम तैनात केली आहे. सीएनबीसी या अमेरिकन वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. चीनने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण हे जर खरे असेल तर दक्षिण चीन सागरातील चीनची ही पहिलीच मिसाईल तैनाती असेल.

चीन या भागात कृत्रिम बेटांची उभारणी करत आहे. आम्ही आमच्या हद्दीत काहीही करु असे चीनचे म्हणणे आहे. दक्षिण चीन सागरातील लष्करी तळ हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुसज्ज करत आहोत. कुठल्याही देशाला लक्ष्य करण्याचा उद्देश नाही असे चीनचे म्हणणे आहे. जे देश आक्रमक नाहीयत त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही असे संरक्षण मंत्रालयाच्या महिला प्रवक्त्या हुआ च्युनयिंग यांनी सांगितले.

दक्षिण चीन सागरावरुन चीनचा शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहे. संपूर्ण दक्षिण चीन सागरावर चीन आपला हक्क सांगत आहे. व्हिएतनामसह अनेक देशांबरोबर चीनचा वाद सुरु आहे. दक्षिण चीन सागरातील नैसर्गिक साधनसंपत्ती या वादामागे मूळ कारण आहे. दक्षिण चीन सागरात अमेरिकेनेही आपली गस्त वाढवली असून त्यावरुन अनेकदा त्यांचा चीन बरोबर वाद झाला आहे.