मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता विमानाचे गूढ कायम असतानाच त्याचा कसून शोध घेण्यासाठी चीनने उच्चशक्तीचे १० उपग्रह अवकाशात तैनात केले आहेत. या उपग्रहांच्या सहाय्याने विमानासह बेपत्ता झालेल्या २३९ प्रवाशांचाही शोध घेता येईल, असा विश्वास वाटत आहे. दरम्यान, हे विमान पुन्हा कौलालंपूरच्या दिशेने वळले असावे, असे संकेत रडारवरून मिळाले असल्यामुळे त्याचा शोध घेण्याची मोहीम आता थायलंडजवळच्या अंदमान समुद्रापर्यंत विस्तारण्यात आली आहे. शोधमोहिमेत ३४ विमाने, ४० जहाजे आणि १० देशांमधील पथके सहभागी आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री उड्डाणानंतर काही काळाने बेपत्ता झालेल्या या विमानाचा शोध घेण्यासाठी चीनच्या ‘झिआन सॅटेलाइट मॉनिटर अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’कडून उच्चशक्तीचे हे १० उपग्रह चीनच्या दक्षिणेकडील समुद्रामध्ये सोमवारी तैनात करण्यात आले. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून ही माहिती देण्यात आली. कौलालंपूर येथून निघालेले हे विमान चीनच्या दक्षिणेकडील समुद्रावरून बीजिंगला जात असतानाच बेपत्ता झाले असून त्यामध्ये २२७ प्रवासी होते. या विमानात चीनचे १५४, भारताचे पाच प्रवासी व १२ कर्मचारी होते.  विमानाचा शोध घेण्यासाठी, सदर घटना घडली त्या वेळचे हवामान, संपर्क यंत्रणा आणि अन्य मुद्दय़ांचा शोध या उपग्रहांच्या सहाय्याने घेण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. प्रवाशांच्या नातेवाइकांचा दबाव वाढल्यानंतर चीन सरकारने मलेशियाशी संपर्क साधून प्रवाशांचा शोध घेण्याचा वेग अधिक वाढविण्याची त्यांना सूचना केली. याखेरीज, चीनची एक उच्चस्तरीय तुकडीही सोमवारी कौलालंपूरला पाठविण्यात आली.

मोहिमेला अधिक वेग
मलेशियानेही विमानाचा शोध घेण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली असून थायलंडच्या सीमेजवळील अंदमान समुद्रामध्ये त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.