आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक आढाव्यातील अंदाज
चीनमधील आर्थिक घसरण त्या देशापुरतीच मर्यादित राहणार नाही तर त्याचा फटका आशिया-पॅसिफिक देशांनाही बसेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
नाणेनिधीने आशिया-पॅसिफिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे की, चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार बघता तेथे नकारात्मक आर्थिक वाढ किंवा आर्थिक घसरण म्हणजे त्याचा अर्थ आशिया-पॅसिफिक देशांना फटका बसणार असाही होतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेच्या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर ही माहिती देण्यात आली.
आर्थिक सुधारणांच्या अंमलबजावणीत कमतरता व काही धोरणांमुळे चीनमध्ये आर्थिक साचलेपण येऊ शकते ते देशांतर्गत स्तरावर राहील असे म्हटले तरी त्याचे जागतिक परिणाम होतील. चीनच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात १ टक्का घट झाली तर आशियाचे एकूण आर्थिक उत्पन्न ०.३ टक्क्य़ांनी कमी होईल.
ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया व न्यूझीलंड यासारख्या देशांच्या धान्य व इतर वस्तूंच्या निर्यातीत वाढ होईल. चीनमध्ये देशांतर्गत मागणी कमी झाल्याने आयात कमी होईल. चीन ज्या देशांना वस्तू निर्यात करतो त्यांच्याकडूनही कमी मागणी राहील त्यामुळे चीनची आयात व निर्यात दोन्हीही कमी होतील.
२०१२ व २०१३ या दोन्ही वर्षांत चीनचा आर्थिक वाढीचा दर कमी होत ७.७ टक्के इतका खाली आला. २०१४ मध्ये वाढीचा अंदाज ७.४ टक्क्य़ांऐवजी ७.३ टक्के करावा लागला व तो २५ वर्षांत सर्वात कमी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.