China Fireworks Factory Explosion 2026: मध्य चीनमधील एका प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या स्फोटात किमान २१ जणांचा मृत्यू झाला असून, ६१ जण जखमी झाले आहेत, असे वृत्त सरकारी माध्यमांनी मंगळवारी दिले. सोमवारी दुपारी हुनान प्रांतातील चांगशा शहरातील फटाक्यांच्या कारखान्यात झाला भीषण स्फोट झाला, असे वृत्त चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने दिले आहे. स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी लगेच बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले.
५०० बचाव पथकं तैनात
शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, घटनास्थळी जवळपास ५०० बचाव पथके तैनात करण्यात आली होती. स्फोट झाला त्या कारखाण्यात दोन काळ्या पावडरच्या गोदामांमुळे जास्त धोका असल्याचे उघडकीस आले. यानंतर बचाव पथकाने तात्काळ या ठिकाणी अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि इतरांना सुखरुप बाहेर काढले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, तपास अधिकारी स्फोटाच्या कारणाचा शोध घेत आहेत.
कंपनी विरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना
समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, कंपनी विरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, पण उपाययोजनांचा तपशील समोर आलेला नाही. स्फोट झाल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, धुराळे प्रचंड लोट हवेत जाताना दिसत आहेत. हाऊशेंग या फटाक्यांच्या कंपनीत हा स्फोट झाल्याचे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिले आहे. या अपघाताची पंतप्रधान शी जिनपिंग यांनी गंभीर दखल घेतली असून, तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
जिनपिंग यांच्याकडून दखल
शी जिनपिंग यांनी प्रमुख औद्योगिक ठिकाणी आणि उद्योगांमध्ये धोक्यांची सूचना मिळेल आणि नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे. सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्यासह आणि लोकांच्या जीविताची व मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ऑब्झर्व्हेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटीच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी चीनने १.१४ अब्ज डॉलर्स किमतीच्या फटाक्यांची निर्यात केली. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये हाँगकाँगच्या वांग फुक कोर्ट संकुलात लागलेल्या भीषण आगीत १६८ लोकांचा मृत्यू होता.
