रॉयटर्स, लंडन, बीजिंग
‘इराणने गुप्तपणे चीनमधून हेरगिरी करणारा उपग्रह प्राप्त केला असून, आखाती देशांमधील अमेरिकी तळांना लक्ष्य करण्यासाठी इराणने त्यांचा वापर केला,’ असे वृत्त फायनान्शिअल टाइम्स या ब्रिटनमधील प्रतिष्ठित वर्तमानपत्रात बुधवारी प्रसिद्ध झाले आहे. चीनने या वृत्ताचे खंडन केले असून, अमेरिकेने त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात इराणला शस्त्रपुरवठा न करण्याच्या मुद्द्यावरून चर्चा झाली आहे.

चीनच्या ‘अर्थ आय कंपनी’ने तयार केलेला ‘टीईई-०१ बी’ हा उपग्रह चीनने अवकाशात सोडल्यानंतर इराणच्या ‘एअरोस्पेस फोर्स’ने त्याचा ताबा घेतला आहे. इराणच्या लष्करी कागदपत्रांतील माहिती फुटल्याचा दावा वृत्तात केला आहे. इराणच्या लष्करातील कमांडरनी अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर उपग्रहांद्वारे देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत. वृत्तात म्हटले आहे, ‘या तळांवर हल्ला करण्यापूर्वी उपग्रहाच्या सहाय्याने मार्च महिन्यात छायाचित्रे घेण्यात आली होती. यासाठी दोन्ही देशांत करार करण्यात आला असून, त्या आधारे इराणला उपग्रहांचा वापर करता येत आहे. चीनच्या उपग्रहाच्या सहाय्याने १३, १४, १५ मार्च रोजी सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळाची छायाचित्रे काढण्यात आली. ट्रम्प यांनी १४ मार्च रोजी या तळावरील अमेरिकी विमाने लक्ष्य झाल्याची माहिती दिली. जॉर्डन, मनामा, बहारीनमधीलही छायाचित्रे उपग्रहाने काढली आहेत.’

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताचे खंडन केले. चीनशी संबंध जोडणारी वृत्ते देऊन काही जण अफवा पसरवीत असल्याची प्रतिक्रिया चीनने दिली आहे. अंतस्थ हेतू ठेवून केलेल्या वृत्तांकनाचा चीन निषेध करीत आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले. अमेरिकेने यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

ट्रम्प यांचे जिनपिंग यांना पत्र

चीनने इराणला शस्त्रे देऊ नयेत, असे पत्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना लिहिले आहे. चीन कुठलीही शस्त्रे इराणला पुरवित नसल्याचे जिनपिंग यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी इराणला शस्त्रे पुरविणाऱ्या देशांवर ५० टक्के आयातशुल्क लावण्याची धमकी दिली होती. ही चीनलाच अप्रत्यक्ष धमकी होती. हा पत्रव्यवहार नेमका केव्हा झाला, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. सामाजिक माध्यमावरील एका टिप्पणीत ट्रम्प म्हणाले, ‘चीनने इराणला शस्त्रपुरवठा न करण्याची हमी अमेरिकेला दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी मी कायमस्वरुपी खुली करीत असल्याबद्दल चीन खूश आहे, ‘इराणला शस्त्रे पुरवणार नसल्याचे त्यांनी मला सांगितले.’