पीटीआय, वॉशिंग्टन : भारत व जपानसह अनेक देशांना लक्ष्य करून चीनने हेरगिरी करणारे बलून्सचा ताफा आकाशात सोडला असल्याचे वृत्त एका माध्यमाने दिले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील संवेदनशील स्थळांवर विहार करणारे चीनचे एक टेहळणी विमान त्या देशाच्या लष्कराने पाडले होते.
दक्षिण करोलिनाच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात एका लढाऊ विमानाने पाडलेल्या चिनी हेरगिरी बलूनच्या निष्कर्षांबाबत अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतासह आपले मित्र व आघाडीतील देश यांना माहिती दिली आहे. अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री वेंडी शेरमन यांनी येथे सुमारे ४० देशांच्या राजदूतावासांना सोमवारी याबाबत माहिती दिली.
‘चीनच्या दक्षिण किनाऱ्याजवळील हैनान प्रांतातून अनेक वर्षे कार्यरत असलेल्या हेरगिरी बलूनने जपान, भारत, व्हिएतनाम, तैवान आणि फिलिपाइन्स यांसह इतर देशांमधील लष्करी आस्थापनांची चीनसाठी सामरिकदृष्टय़ा महत्त्वाची असलेली माहिती गोळा केली आहे’, असे वृत्त ‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ने मंगळवारी दिले. हे वृत्त अनेक अनामिक संरक्षण व गुप्तचर अधिकाऱ्यंच्या मुलाखतींवर आधारित होते. काही प्रमाणात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हवाई दलाच्या वतीने संचालित केली जाणारी ही हेरगिरी विमाने पाच खंडांवर आढळून आली असल्याचे या दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे.