भारताची चिंता वाढवणारी बातमी : अरुणाचलपर्यंत पोहचली चीनची बुलेट ट्रेन; वेग १६० किमी प्रती तास

विशेष म्हणजे हा प्रदेश जमीनीखालील भौगोलिक हलचालींसाठी जगभरात ओळखला जात असल्याने विशेष तंत्रज्ञानाचा वापर करुन या रेल्वे मार्गाचं काम करण्यात आलं आहे.

China Bullet Train Close To Indian Border
या मार्गावर १६० किमी प्रती तास वेगाने रेल्वे गाड्या धावू शकतील. (सौजन्य : रॉयटर्स आणि गुगल मॅपवरुन साभार)

चीनने भारतीय सीमेजवळ असणाऱ्या तिबेटच्या पठारपर्यंत आपली पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरु केलीय. ही बुलेट ट्रेन तिबेटची राजधानी असणाऱ्या ल्हासा शहराला नायींगशी शहराशी जोडणार आहे. नायींगशी अरुणाचल प्रदेशजवळ असणाऱ्या तिबेटच्या सिमावर्ती भागातील शहर आहे. सिचुआन-तिबेट रेल्वेच्या ४३५.५ किलोमीटर लांबीच्या ल्हासा-नायींगशी रेल्वेचं उद्घाटन चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या आठवडाभर आधी उद्धाटन करण्यात आलं आहे. १ जुलै रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत.

चीनमधील सरकारी वृत्तवाहिनी असणाऱ्या क्षिनुआने दिलेल्या वृत्तानुसार तिबेटमधील स्वायत्तत क्षेत्रात पहिल्यांदाच विजेवर चालणाऱ्या रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांची वाहतूक शुक्रवारपासून सुरु झालीय. तिबेटमधील छिंघाई-तिबेट रेल्वेनंतर शिचुआन-तिबेट रेल्वे मार्ग हा तिबेटला मेन लॅण्ड चायनाशी जोडणारा दुसरा मुख्य मार्ग ठरणार आहे. हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे. विशेष म्हणजे हा प्रदेश जमीनीखालील भौगोलिक हलचालींसाठी जगभरात ओळखला जात असल्याने विशेष तंत्रज्ञानाचा वापर करुन या रेल्वे मार्गाचं काम करण्यात आलं आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘ही’ आहे ताशी ६२० किमी वेगाने धावणारी चीनमधील ‘फ्लोटिंग ट्रेन’; फोटो पाहून व्हाल थक्क

शिचुआन-तिबेट हा नवीन रेल्वे मार्ग शिचुआन प्रांताची राजधानी असणाऱ्या चेंगदुपासून याहयान-छामदो मार्गे तिबेटपर्यंत येतो. या रेल्वेमार्गामुळे चेंगदु आणि ल्हासा या दोन मुख्य शहरांमधील अंतर तब्बल ३५ तासांनी कमी होणार आहे. पूर्वी चेंगदु ते ल्हासा प्रवास करण्यासाठी ४८ तासांचा अवधी लागायचा आता हा वेळ केवळ १३ तासांवर आला आहे. नायींगशी म्हणजेच लिंझीपर्यंत हा रेल्वे मार्ग येतो. लिंझी हे शहर भारत-चीन सीमेजवळच असून तेथून काही अंतरावर भारताचे अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे.

नक्की वाचा >> “…तर आमचा पुढचा बॉम्ब जहाजाच्या मार्गात नाही जहाजावर पडेल”; रशियाने ब्रिटनला दिला इशारा

डिसेंबरमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रेल्वे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना शिचुआन आणि लिंझीला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढवण्यासंदर्भातील निर्देश दिले होते. हा रेल्वे मार्ग देशाच्या सुरक्षेसाठी आणि भारत चीन सीमेवरील शांततेसाठी महत्वाचा ठरेल असं जिनपिंग म्हणाले होते. हा रेल्वे मार्ग तिबेट रेल्वे कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेडने बांधला आहे. या मार्गावर १६० किमी प्रती तास वेगाने रेल्वे गाड्या धावू शकतील असा दावा कंपनीने केला आहे. या ४३५ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर ४७ बोगदे आणि १२० पूल आहेत.

तिबेटची राजधानी ल्हासा आणि पूर्व तिबेटमधील लिंझीला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाचं काम २०१४ साली सुरु झालं होतं. या रेल्वे मार्गाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग हा समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: China launches first bullet train between lhasa nyingchi tibet close to indian border scsg

ताज्या बातम्या