एपी, इस्लामाबाद

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान खंडित झालेली शांतता चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. चीन या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करत असून उत्तर चीनच्या उरुमची येथे ही चर्चा होत असल्याची माहिती दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बुधवारी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ संघर्ष सुरू आहे. यामध्ये विशेषतः पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. त्यामध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांबरोबरच सामान्य नागरिकांचाही बळी गेल्याचा अफगाणिस्तानचा दावा आहे.

दरम्यान, चीनने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या माहितीला दुजोरा दिला नाही, तसेच ती नाकारलीही नाही. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जणांचे शिष्टमंडळ उरुमचीला रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि गुप्तचर विभागाच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश आहे. ही बैठक काही दिवस चालण्याची शक्यता आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर दोन्ही देशांमधील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.