पीटीआय, बीजिंग

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध नजीकच्या काळात ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेने चीनवर गुरुवारी लादलेल्या १४५ टक्के आयातशुल्काला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर ८४ टक्क्यांऐवजी १२५ टक्के आयातशुल्क आकारण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या दडपशाहीला एकत्रितपणे प्रतिकार करण्याचे आवाहन चीनने युरोपीय संघटनेला केले.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७० देशांवर लादलेला आयातशुल्काचा निर्णय दोन दिवसांपूर्वी मागे घेतला. मात्र चीनवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवून व्यापारयुद्ध अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले. त्यानंतर ही शुल्कवाढ १४५ टक्क्यांपर्यंत करण्यात आली. अमेरिकेची ही दडपशाही आहे, असे सांगत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी प्रत्युत्तर दिले. आता पुन्हा अमेरिकेने चिनी उत्पादनांवर शुल्क लादले, तर सध्याच्या शुल्क पातळीवर चिनी बाजारपेठेला अमेरिकी आयात स्वीकारणे अशक्य आहे. चीन त्याकडे दुर्लक्ष करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

युरोपीय संघटनेला आवाहन

ट्रम्प यांनी चीन वगळता युरोपीय संघटना, भारत आणि इतर अनेक देशांवर लादलेला कर मागे घेतला असला तरी अमेरिकी दडपशाहीविरोधात चीन आणि युरोपिय संघटनेने एकत्र येण्याची गरज असल्याचे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी शुक्रवारी सांगितले. चीन आणि २७ सदस्यीय गटाने आर्थिक जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वातावरणाचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे आणि एकतर्फी दडपशाहीचा संयुक्तपणे प्रतिकार केला पाहिजे, असे जिनपिंग यांनी सांगितले. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर क्षी म्हणाले, की चीन आणि युरोपीय संघटना आर्थिक जागतिकीकरण आणि मुक्त व्यापाराचे दृढ समर्थक आहेत. व्यापारयुद्धात कोणीही विजेता ठरणार नाही. मात्र जगाविरुद्ध जाण्याच्या निर्णयामुळे स्वत: जगापासून तुटले जाल, असा इशाराही जिनपिंग यांनी अमेरिकेला दिला.

अतिरिक्त शुल्कवाढ जागतिक विनोद

अमेरिकेकने वाढवलेले शुल्क आता अर्थहीन राहणार आहे. त्यांनी १४५ टक्क्यांपेक्षाही अधिक आयातशुल्क आकारले तर जगाच्या आर्थिक इतिहासात ‘विनोद’ म्हणून त्याकडे पाहिले जाईल, असे चीनच्या सीमाशुल्क आयोगाने म्हटले आहे. अमेरिका चीनच्या हितसंबंधांना मोठ्या प्रमाणात कमकुवत करत राहिली, तर बीजिंग कठोर प्रतिकारात्मक उपाययोजना करेल आणि शेवटपर्यंत लढेल, असा इशाराही आयोगाने दिला.

अमेरिकेविरोधात चीनची राजनैतिक मोहीम

ट्रम्प चीनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असताना, अमेरिकेच्या एकतर्फी निर्बंधांविरुद्ध जागतिक मत निर्माण करण्यासाठी बीजिंगनेही राजनैतिक मोहीम सुरू केली आहे. क्षी जिनपिंग हे पुढील आठवड्यात व्हिएतनाम, मलेशिया आणि कंबोडियाच्या दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकी आयातशुक्लामुळे सर्वाधिक परिणाम झालेले हे प्रमुख आशियाई देश आहेत. स्वतंत्रपणे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी वेगवेगळ्या देशांमधील देशाच्या राजदूतांची बैठक घेतली. चीनविरुद्ध अमेरिकेच्या ‘शुल्क’युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या राजनैतिक प्राधान्यांची रूपरेषा त्यात मांडली.

दृष्टिक्षेपात अमेरिका चीन व्यापार

गेल्या वर्षी दोन्ही देशांत मिळून एकूण ५८५ अब्ज डॉलरचा व्यापार झाला. पण यात अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीचे मूल्य १४५ अब्ज डॉलर आहे. याउलट चीनकडून अमेरिकेला होणारीचे निर्यातीचे मूल्य ४४० अब्ज डॉलर आहे. म्हणजे २९५ अब्ज डॉलरचे आधिक्य (सरप्लस) चीनकडे आहे. अमेरिकेतून चीनमध्ये सर्वाधिक निर्यात सोयाबिनची होते. याशिवाय तयार औषधे, पेट्रोलियम, विमानांची इंजिन्स हेही अमेरिकेकडून चीनकडे जाते. तर चीनकडून अमेरिकेत खेळणी, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (प्राधान्याने स्मार्टफोन्स), विविध प्रकारचे विद्याुतघट यांची निर्यात होते.