China Nuclear Missile Silos expansion: चीनच्या एका दुर्गम वाळवंटात एक विस्तीर्ण लष्करी तळ आकाराला येत आहे. सुरक्षा विश्लेषकांच्या मते, अमेरिकेने चीनच्या अण्वस्त्रांवर पहिला हल्ला केल्यास, बीजिंगची प्रत्युत्तर देण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होऊ नये, या उद्देशाने हे बांधकाम केले जात असल्याचे दिसते. चीनची अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे अमेरिकेतील कोणत्याही शहरापर्यंत पोहोचण्यास आधीच सक्षम आहेत. आता, ‘रॉयटर्स’ने पाहणी केलेल्या उपग्रह चित्रांनुसार (Satellite Images), चीन लष्कराच्या सर्वात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे रक्षण करणाऱ्या दुर्गम अणू सायलोजवळ प्रक्षेपण पॅड, बंकर आणि संपर्क यंत्रणांचे एक मोठे जाळे उभारत असल्याचे समोर आले आहे.
मजबूत पायाभूत सुविधांचा विस्तार
या उपग्रह चित्रांमध्ये ८० पेक्षा जास्त लष्करी पॅड दिसत आहेत. चीनच्या वाढत्या मोबाईल क्षेपणास्त्र वाहक आणि हवाई संरक्षण यंत्रणेसाठी याचा वापर होऊ शकतो. रॉयटर्ससाठी या चित्रांचे विश्लेषण करणाऱ्या तीन सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, येथे इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणा, उपग्रह दळणवळण आणि नियंत्रण कक्षासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील उभारल्या जात आहेत. या अवाढव्य बांधकामाची माहिती यापूर्वी कधीही समोर आली नव्हती. चीनच्या जमिनीवर आधारित अणुशक्तीचे रक्षण करण्यासाठी आणि ती कार्यान्वित ठेवण्यासाठी या मजबूत पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. तैवानच्या सार्वभौमत्वासारख्या मुद्द्यांवरून अमेरिकेसोबत ताणतणाव वाढत असताना, चीनची ही नवी यंत्रणा आपली ‘दुसऱ्यांदा हल्ला करण्याची क्षमता’ अधिक मजबूत करत असल्याचे संकेत देत आहे.
हवाईमधील ‘पॅसिफिक फोरम’ थिंक टँकचे संलग्न अभ्यासक अलेक्झांडर नील म्हणाले, “सायलो क्षेत्रापलीकडे वाळवंटातील हजारो चौरस किलोमीटर क्षेत्रात हे पायाभूत बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे आपल्याला दिसते. याच्या अचूक क्षमतेचा विचार केला तर चीन आपल्या धोरणात्मक अणू प्रतिबंधक क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ आणि विविधता आणत आहे.” वाळवंटातील सायलोचे रक्षण करणे हे चीनच्या मर्यादित पण विश्वासार्ह अणू प्रतिबंधक उद्दिष्टासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रथम हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या धोरणावर हे आधारित आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) पाणबुड्या आणि विमानांमधून अण्वस्त्रे डागू शकत असली, तरी वायव्य शिनजियांग प्रांत आणि गान्सू प्रांतातील सायलो क्षेत्रे त्यांच्या अणुशक्तीचा मुख्य गाभा आहेत.

चीनची अण्वस्त्र निर्मिती ही राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या लष्करी आधुनिकीकरणातील सर्वात जास्त लक्षवेधी बाब ठरली आहे. विदेशी मुत्सद्दींच्या मते, बीजिंगमध्ये असलेली पारदर्शकता आणि चीनच्या बदलत्या अणू क्षमता व हेतूंबाबत चर्चा करण्यात अमेरिकेला आलेले अपयश, यामुळे हे क्षेत्र अधिक चर्चेत आले आहे. चीनच्या धोरणाचा मुख्य आधार ‘नो फर्स्ट युज’ हा आहे. म्हणजेच त्यांचे सैन्य आधी अणू हल्ला करणार नाही. मात्र, काही पाश्चात्य मुत्सद्दी आणि विश्लेषकांच्या मते, तैवानच्या संघर्षात बाहेरील देशांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी चीन अण्वस्त्रांचा धाक दाखवू शकतो.
