scorecardresearch

One Child Policy च्या काळात अविवाहित जोडप्याने १५ मुलांना जन्म दिल्याचा खुलासा; चीन सरकारने ११ अधिकाऱ्यांना…

लोकसंख्येसंदर्भातील कठोर नियमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये समोर आलं एक विचित्र प्रकरण

China
तपासादरम्यान समोर आलं सत्य (फाइल फोटो सौजन्य रॉयटर्स)

चीन हा देश त्यांची लोकसंख्या आणि लोकसंख्येसंदर्भातील नियमांसाठी ओळखला जातो. मागील अनेक दशकांपासून एक मूल धोरण म्हणजेच वन चाइल्स पॉलिसीमुळे हा देश कायमच जगभरात चर्चेत राहिला. मागील वर्षी चीनने लोकसंख्येमधील समतोल राखण्यासाठी नवीन धोरण स्वीकारलं आहे. मात्र नुकतचं चीनमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं असून कठोर नियम असतानाही एका जोडप्याने एक मूल धोरण असतानाच एक दोन नाही तर तब्बल १५ मुलांना जन्म दिल्याचा खुलासा झालाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर चीन सरकारने अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचललाय.

चीनमध्ये एका जोडप्याने दोन मुलांहून अधिक मुलांना जन्म दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ११ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलीय. गुआंग्शी जुआंग या प्रांतामध्ये तपासादरम्यान एका जोडप्याला १५ मुलं असल्याची माहिती समोर आली. ७६ वर्षीय लियांग आणि त्यांची ४६ वर्षीय पत्नी लू हॉन्गलेन यांनी १९९५ ते २०१६ दरम्यान चार मुलं आणि ११ मुलींना जन्म दिल्याची माहिती तपासात समोर आलीय. हा खुलासा झाल्यानंतर कुटुंब नियोजन विभागातील ११ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलंय. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये लिकून शहरातील मुख्य अधिकारी आणि स्थानिक कुटुंबनियोजन विभागाचे निर्देशकाचाही समावेश आहे. या सर्वांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलंय.

ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या लियांग आणि लू हान्गलेन यांची ओळख १९९४ मध्ये गुआंग्डोंग येथे झाली होती. त्यानंतर त्या दोघांनी अनौपचारिक पद्धतीने लग्न केलं. दोघांनाही लग्न केलं तरी त्याची नोंदणी मात्र केली नाही. हे दोघे एकत्र राहू लागले. त्यानंतर पुढील २० वर्षांमध्ये या दोघांना एकूण १५ मुलं झाली. कायदेशीर दृष्ट्या हे जोडपं आजही विवाहित नाही. तरीही या दोघांनी २०१५ ते २०१९ दरम्यान गरीबांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सब्सिडीचाही फायदा घेतल्याची माहिती तपासात समोर आलीय. त्यामुळेच अविवाहित जोडप्याला १५ मुलं झाली तरी अधिकाऱ्यांना कळलं नाही असा ठपका ठेवत सर्वांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

१९७९ मध्ये चीन सरकारने वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन चाइल्ड पॉलिसी लागू केली. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१५ मध्ये या धोरणामध्ये बदल करत दोन मुलांना जन्म देण्यासंदर्भातील नवीन कायदा टू चाइल्ड पॉलिसीअंतर्गत तयार करुन अंमलात आणला. चीनमध्ये २०१५ पासून टू चाइल्स पॉलिसी आहे. २०२१ मध्ये या टू चाइल्ड पॉलिसीमध्ये बदल करण्यात आला. या धोरणामध्ये असणारी दंडाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. २०१९ मधील हे प्रकरण आता समोर आलं असल्याने २०२१ च्या सुधारित कायद्यानुसार या जोडप्याला आर्थिक दंडाच्या रुपातील शिक्षा केली जाणार नाही.

चीनची लोकसंख्या मागील वर्षी १.४१२६ अब्ज इतकी होती. म्हणजेच चीनची लोकसंख्या या कालावधीमध्ये पाच लाखांहूनही कमीने वाढली. मागील पाच वर्षांपासून देशात जन्मदर सातत्याने घसरत आहे. चीननमध्ये सद्या वृद्ध लोकांची संख्या वाढत असून हे चीनसमोरील मोठं आर्थिक आव्हान ठरु शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: China officials penalised for allowing an unmarried couple to have 15 children in violation of the one child policy scsg

ताज्या बातम्या