अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या हल्लयानंतर मध्य पूर्वेत संघर्ष पेटला आहे. यादरम्यान भारताप्रमाणे चीनने देखील या संघर्षावर चर्चेतून मार्ग काढला गेला पाहिजे असे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी चीन हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सर्व बाजूंनी संयम राखण्याचेही आवाहन केले आहे.

लिन यांनी माहिती दिली की परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आखाती देशांमधील राजकीय नेत्यांशी फोनवरून संवाद साधला आहे. यामध्ये युएईचे उपपंतप्रधान अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांचाही समावेश आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्री म्हणाले की, चीन राष्ट्रीय सुरक्षा कायम ठेवण्यासाठी युएईच्या पाठिशी उभा राहिल आणि हा वाद राजनैतिक मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इतर आखादी देशांनाही चीनचा पाठिंबा असेल

त्यांच्या कार्यालयाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “… युद्ध पसरणे हे कोणत्याही पक्षाच्या हिताचे नाही, आणि यामुळे फक्त लोकांचे हाल होतील. “

“चीन शांततेची आशा सोडून देणार नाही आणि विधायक भूमिका बजावत राहिल,” असेही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच शांतता स्थापन व्हावी यासाठी मध्यपूर्वेतील देशांमध्ये विशेष दूत पाठवण्याची योजना असल्याचीही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

तसेच त्यांच्या कार्यालयाने माहिती दिली की, त्यांनी सौदी अरेबियाचे त्यांचे समकक्ष फैसल बिन फरहान अल सौद यांच्याशी देखील चर्चा केली आहे. तसेच त्यांनी सौदी अरेबियाने रास तनुरा (Ras Tanura) तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला झाल्यानंतरही सौदीने दाखवलेल्या संयमाचे आणि या वादातून शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या त्यांच्यावचबद्धतेचेही कौतुक केले. “संघर्षाचा विस्तार आणि तीव्रता वाढत असून त्याचा परिणाम सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांवर होत आहे, हे चीन इच्छित नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

वांग यांनी रशिया, ओमान आणि फ्रान्स यांच्यासह इराण आणि इस्रायल या देशांबरोबर देखील चर्चा केली आहे.

दरम्यान, चीन सरकारने या आठवड्यात माहिती दिली की त्यांनी इराणमधून आपल्या ३००० हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या लष्कराने तेहरानसह इराणच्या अनेक शहरांवर भीषण हल्ला केला, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये संपूर्ण प्रदेश हादरून गेल्याचे पाहायला मिळाले. इराणने अमेरिकन लष्करी तळ, दूतावास, तसेच तेल रिफायनरी आणि ॲमेझॉन क्लाउड डेटा सेंटर्सना लक्ष्य केले आहे. या संघर्षात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांसारख्या शेजारील अरब राष्ट्रांमध्ये देखील इराणने हवाई हल्ले केले. आज या संघर्षाचा सहावा दिवस असून आजही अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्याकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले.