Donald Trump China Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर आहेत. ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत होर्मुझ सामुद्रधुनी कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्णपणे खुली करण्यात यावी या मुद्यावर दोन्ही देशांनी भर दिला. तसेच, इराणकडे कधीही अण्वस्त्रं असू नयेत, याला चीनने देखील समर्थन दिले. याशिवाय विविध महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
अमेरिकी व्यवसायांना चिनी बाजारपेठेत संधी द्या – ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती व्हाईट हाऊसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात अत्यंत सकारात्मक बैठक पार पडली. यावेळी दोघांमध्ये दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली. अमेरिकी व्यवसायांना चिनी बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध करून देणे, अमेरिकेतील उद्योगांमध्ये चिनी गुंतवणूक वाढवणे याबाबत देखील सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या एका सत्रात अमेरिकेतील अनेक बड्या कंपन्यांचे प्रमुख देखील सहभागी झाले होते.
होर्मुझ खुली करण्याबाबत एकमत
व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत चर्चा झाली. ऊर्जा वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही सामुद्रधुनी खुली राहणे आवश्यक आहे, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. तसेच, होर्मुझमध्ये लष्करी बळाचा वापर करणे आणि तिथं कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरणी करणे चुकीचे असल्याचे मत जिनपिंग यांनी व्यक्त केले. दरम्यान, भविष्यात होर्मुझ सामुद्रधुनीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्याची इच्छाही चीनने व्यक्त केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
इराणकडे अण्वस्त्रं असू नये यासाठी चीनची सहमती
उभय देशात यावेळी अमली पदार्थ तस्करी आणि गुन्हे याबाबतही चर्चा झाली. दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी अमली पदार्थांचे घटक अमेरिकेत येण्यापासून रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. याशिवाय चीनने अमेरिकन कृषी उत्पादनांच्या खरेदीत वाढ करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेच्या भूमिकेर देखील बैठकीत चर्चा झाली. इराणकडे कधीही अण्वस्त्रं असू नयेत यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
